गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातली आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला ५ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तासापूर्वीच निवडणुकीचा जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे बुधवारी (दि.१३) सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहे.
जिल्ह्यातील मुदत पूर्ण झालेल्या १८९ ग्रामपंचायत एकूण १६९३ जागांसाठी निवडणूक होत असून ३११ जागा बिनविरोध आल्याने १३८२ जागांसाठी ३२५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासाठी १५ जानेवारीला ६५३ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण मागील आठ दहा दिवसांपासून चांगलेच तापले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची वारी मतदारांच्या दारी दिसून येत होती. मागील आठ दिवसांपासून उमेदवार मतदारांना रामराम करुन लक्ष असू द्या, असे म्हणत भेटी घेत होते. आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून बुधवारी सायंकाळी ५ वाजतापासून प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मतदार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत सोशल मीडियावरुन सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असल्याचे चित्र होते. मतदान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांना निकालासाठी तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
.......
आता लक्ष सरपंचाच्या आरक्षणाकडे
यंदा निवडणूक विभागाने पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुुकीत पाहिजे तसा उत्साह दिसून आला नाही. मात्र यामुळे खर्चाला निश्चितच ब्रेक लागला. ही निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाणार असल्याने निवडून आलेल्या कोणत्या उमेदवाराला सरपंच पदाची लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
........
निवडणूक विभाग सज्ज
१५ जानेवारीला १८९ ग्रामपंचायतसाठी एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी एकूण ४३३२ निवडणूक अधिकारी कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. मतदान केंद्रापासून ते बूथ व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.