प्रात्यक्षिक झालेल्या गावात ७० टक्के : तर इतर गावात २५ टक्के लागवडकाचेवानी : प्रात्यक्षिक असणाऱ्या शेतात ७० टक्के आणि अन्य गावात २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांनी ‘श्री पद्धती’चा वापर करुन रोवणी केल्याचे दिसून आले आहे. श्री पद्धतीचे महत्त्व आणि त्यापासून होणाऱ्या भरघोस लाभाचे महत्त्व शेतकऱ्यांना जाणवू लागले, हे यावरुन दिसून येत आहे.श्री पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या शेतात भेट देऊन रोपट्यांतील फुटव्यांची संख्या मोजण्यात आली. तेव्हा २० ते २५ फुटवे दिसून आले. श्री पद्धत ही भात रोवणीसाठी काही प्रमाणात खर्चिक असली तरी उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या पद्धतीत काहीसा वेळ वाया जातो. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना भरपूर आहेत, असे मत कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी आणि मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी खडकी (डोंगरगाव) येथील डॉ. कटरे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.श्री पद्धतीने रोवणी केल्याने खोडकिडा, तुडतुडे आणि मावा यासारखे कीड टिकून राहत नाही. बांध्यात हवा खेळती राहते. रोपट्याला खालपर्यंत सूर्याची किरणे लागतात, तेव्हा त्यांची वाढ जोमाने होते. फुटवे फुटतात आणि त्यांचीही वाढ झपाट्याने होते. धानाच्या तरूणावस्थेत फुटव्यांची संख्या ४० ते ४५ पर्यंत जाते, असे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी लोकमतला सांगितले.रोवणीचे कामे एकाच वेळी आल्याने आणि मजुराची संख्या कमी असल्यास ही पद्धत परवडण्यासारखी नाही, असे शेतकरी म्हणतात मात्र यावर योग्य ती काळजी घेऊन आणि रोवणीची घाई न करता लागवड केल्यास याच सर्वाधिक लाभ घेतला जाऊ शकतो, असे मत मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी उपस्थित शेतकऱ्यांजवळ व्यक्त केले. श्री पद्धतीतून लागवड केल्यास रोगराईच्या खर्चात कमी होते. खताचे प्रमाण कमी लागते आणि उत्पन्नात दीड ते दोन पट वाढ होते, असेही डी.एस. पारधी म्हणाले. प्रात्यक्षिक असणाऱ्या गावात ७० टक्के रोवण्या आणि अन्य गावात २५ ते ३० टक्के रोवण्या श्री पद्धतीतून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)
श्री पद्धतीच्या लागवडीत सातत्याने वाढ
By admin | Updated: August 13, 2015 02:19 IST