सडक/अर्जुनी : सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत बनविण्यात आलेल्या तिन्ही साठवण बंधाऱ्याचे बांधकाम कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले. निकृष्ट साहित्य वापरुन तयार केलेल्या साठवण बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम दिसून येवू नये व पावसाळ्यात बंधारा वाहून जावू नये म्हणून या साठवन बंधाऱ्याला प्लास्टर करुन लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील निकृष्ट दर्जाचे साठवन बंधारे लघू बाटबंधारे विभाग जि.प. गोंंदिया उपविभाग अंतर्गत तालुक्यातील डव्वा येथे आदीवासी उपयोजना अंतर्गत तीन साठवन बंधाऱ्यांचे काम मंजूर करण्यात आले. एका बंधाऱ्यासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचे आदेश ३ जानेवानी २०१३ व कामाचा कालावधी १२ महिने होता. परंतु या बंधाऱ्याचे काम एप्रिल २०१४ मध्ये सुरु करुन जून महिन्यापर्यंत काम करण्यात आले.दुसऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी आदिवासी उपयोजना अंतर्गत १४ लाख ७१ हजार रुपये मंजूर झाले. या बंधाऱ्याच्या कामाचा आदेश ३ जानेवारी २०१२ रोजी काढण्यात आला. हा बंधारा गावरान शेतामध्ये तयार करण्यात आला. या साठवन बंधाऱ्यावर कोणत्याच प्रकारचा नाला नाही. तसेच शेताला लागून खाली जागेवर तयार करण्यात आला. तिसरा बंधारा डव्वा येथील धम्मकुटी रस्त्याच्या नाल्यावरील ओव्हरफ्लो तयार करायचा होता. त्या रपट्यावर हे बांधकाम करण्यात आले. या कामासाठी १४ लाख ८० हजार रुपये मंजूर करण्यात आले. तसेच या कामाची प्रशासकीय मान्यता ५ डिसेंबर २०११ रोजी देण्यात आली. या तिन्ही साठवन बंधाऱ्याचे बांधकाम शाखा अभियंता रामटेककर यांच्याकडे होते. तसेच या साठवन बंधाऱ्यांच्या कामावर दगडाने फोडले तर काँक्रीट खचते. या तिन्ही निकृष्ट कामांना लपविण्यासाठी कंत्राटदाराने सिमेंट प्लास्टर केले. येथील एक बंधारा डव्वा जवळील दीपकनगर येथील घराला लागून तयार केला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती पाण्याने वाहून जाईल आणि डव्वा-पुतळी रस्ता बंद होईल. या तिन्ही साठवन बंधाऱ्यांचे काम गोंदिया येथील बेरोजगार कंत्राटदाराला देण्यात आले. या कामावर कोणाचीही देखरेख नसल्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.वास्तविक म्हणजे या कामावर जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रा.पं. यांची देखरेख असणे गरजेचे होते. तसेच ज्या ठिकाणी बंधाऱ्यांची गरज आहे, त्याच ठिकाणी बंधारे बांधायला हवे. मागील ५ ते ७ वर्षापासून सडक/अर्जुनी तालुक्यात व डव्वा परिसरात बंधाऱ्यांचा महापूर आला आहे. आता बंधारे बांधायचे कुठे, म्हणून गावाजवळ बंधारे बांधायला सुरवात झाली आहे. आज डव्वा क्षेत्रात २०० ते ३०० मीटर अंतरावरील नाल्यांवर बंधारे पहायला मिळतात. विशेष म्हणजे साठवन बंधाऱ्याला सिमेंट प्लास्टर केले जात नाही. हे संपूर्ण काम सिमेंट कॉक्रिटचेच असते. परंतु कंत्राटदार अधिकाऱ्याला हाताशी धरुन बंधाऱ्याला सिमेंट प्लास्टर करुन बोगस बंधारे तयार करतात. त्यामुळे शासनाची महत्वाकांक्षी पाणी अडविण्याची योजना धुळीस मिळत आहे. डव्वा येथील तिन्ही साठवन बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामासाठी आलेला निधी कंत्राटदाराने उपयोगात आणला नाही. सदर साठवन बंधाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट
By admin | Updated: August 6, 2014 23:55 IST