लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील मुंडीपार ई. येथील ग्रामवासीयांनी लोकसहभागातून चिचटोला व मुंडीपारच्या मालगुजारी तलावाची विभागणी करुन आपल्या हद्दीतील तलावाचे बांधकाम सुरु केलेले आहे. सद्यस्थितीत सर्वत्र रोजगार हमीचे काम सुरु असताना लोकसहभागातून श्रमदान करुन राबविलेला हा उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.उल्लेखनीय म्हणजे सदर तलाव चिचटोला व मुंडीपार ग्रामवासीयांच्या मालकीचे होते. परंतु या तलावावर आजपर्यंत चिचटोला ग्रामवासीयांनी कब्जा केला होता. या दोन्ही गावांच्या मिळून असलेल्या तलावाचा लाभ फक्त चिचटोलावासी घेत होते. त्यामुळे मुंडीपार ग्रामवासी सदर तलावाच्या हक्कापासून वंचित होते.अलीकडे गुरेढोरे व शेतीकरिता पाण्याची टंचाई लक्षात घेता मुंडीपार ग्रामवासीयांनी आपल्या हक्काची मागणी केली. मात्र त्यांची ही रास्त मागणी चिचटोलावासीयांनी धुळकावून लावली. यावर मुंडीपारवासीयांनी भूमि अभिलेख कार्यालयात विनंती अर्ज करुन तलावाची मोजणी केली. यात जुना गट क्रं. २७२ चे मोजमाप केले असता सुमारे २५ एकर जागा मुंडीपार ग्रामवासीयांच्या मालकीची दाखविलेली आहे.यावर मुंडीपार ग्रामवासीयांनी ग्रामसभा घेवून लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून आपल्या मालकीच्या जागेत तलावाचे बांधकाम सुरू केले. त्यावर चिचटोला ग्रामवासीयांनी आक्षेप नोंदवून सदर काम बंद करण्याकरिता प्रयत्न सुरू केले. परंतु मुंडीपार ग्रामवासीयांनी सुध्दा आपल्या हक्काच्या लढाईकरिता आपली कंबर कसली आहे.या मुंडीपारवासीयांच्या हक्काच्या निर्णायक लढ्याकडे सडक-अर्जुनी तालुक्यातील लोकांचे लक्ष केंद्रीत झाले असून हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसहभागातून तलावाचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:15 IST
सडक-अर्जुनी तालुक्यातील मुंडीपार ई. येथील ग्रामवासीयांनी लोकसहभागातून चिचटोला व मुंडीपारच्या मालगुजारी तलावाची विभागणी करुन आपल्या हद्दीतील तलावाचे बांधकाम सुरु केलेले आहे.
लोकसहभागातून तलावाचे बांधकाम
ठळक मुद्देश्रमदान ग्रामस्थांचे : २५ एकर जागा मुंडीपार ग्रामच्या मालकीची