साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोठरा ग्रामपंचायत अंतर्गत कर्नुटोला येथील शेतकऱ्यांचे उभे धानाचे पीक पाण्याअभावी सुकले आहे. यासाठी विद्युत विभाग जबाबदार असल्याचा येथील शेकऱ्यांचा आरोप आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी कोटरा येथील चिंधू आसोले व शेतकऱ्यांनी तहसीलदार सालेकसा यांना निवेदनातून केली आहे. प्राप्त माहितीनुसार कोटरा येथे कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेली सिंचन योजना विज कनेक्शन न मिळाल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात असमर्थ ठरली. यावर्षीचा धानाच्या पिकापासून शेतकऱ्यांना वंचीत राहण्याची पाळी आली आहे. सालेकसा तालुक्यात पुजारीटोला, कालीसरार ही दोन धरणे आहेत. या धरणाचा बऱ्याच शेतकऱ्यांना धानपिकासाठी फायदा होतो. परंतु ज्या गावात ही धरणे आहेत त्याच गावातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळत नाही. यात कोटरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कर्णुटोला, हलबीटोला, कोटरा, या गावातील शेतकऱ्यांची बरीच शेती ही कोरडवाहू असून कोणत्याही धरणाचे पाणी मिळत नाही. ही परिस्थिती लक्षात देवछाया उपसा सिंचन सहकारी संस्था कोटराच्या माध्यमातुन वेळोवेळी आंदोलन करून कोटरा गावाकरीता जलसिंचन योजना तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने सदर योजनेला मंजूरी देऊन योजनेचे काम सूरु करण्यात आले. केवळ ५० ते ६० टक्के सदर योजनेचे कार्य पार पडले असून परिसरातील ३२३ हेक्टर जमिनिला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी विज कनेक्शन घेण्यासाठी संबंधित विभागामार्फत २३ एप्रिल २०१४ ला एक लाख ३२ हजार ५९२ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट विद्युत मंडळाकडे भरणा केला. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही विद्युत मंडळाने अजुनपर्यंत विज कनेक्शन दिले नाही. त्यामुळे पावसाळ्यात सदर योजनेचे पाणी कोटरा, कर्णुटोला गावातील शेतकऱ्यांना मिळू शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे उभे धानाचे पीक सुकून गेले आहे.
सुकलेल्या धानपिकासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या
By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST