हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा
गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांनी चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. आता पुलाला मंजुरी आली आहे. मात्र, लवकर काम करण्याची मागणी आहे.
कॉलनीत नाली बांधकामाची मागणी
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीत नाल्यांचे बांधकाम नसल्याने कित्येकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून राहते. अशात कित्येकदा चिखलात घसरून नागरिक घसरून पडले आहेत. नगर परिषदेने घरासमोर नाली बांधकाम केल्यास पावसाचे पाणी त्यातून निघून जाणार.
सिव्हिल लाइन्स परिसर अंधारात
गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील माता मंदिर चौक ते पुढे मामा चौकापर्यंत पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्ह्यास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
साखरीटोला : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पादंण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.
येडमाकोटा ते केसलवाडा रस्त्याची झाली दुर्दशा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील येडमाकोट ते केसलवाडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. केसलवाडा या गावावरून अनेक नागरिक तसेच महाविद्यालय विद्यार्थी येडमाकोट रस्त्यांनी येऊन सरळ तुमसर ते तिरोडा एसटी बसने जात असतात. येडमाकोट फाट्याजवळ नवीन प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिक, विद्यार्थी एकत्र येऊन थांबत असतात. येडमाकोट ते केसलवाडा हा रस्ता जीर्ण झाला असून, गिट्टी व मुरूम उखडलेला असून, गिट्टी रस्त्याच्या बाहेर आली आहे. हा रस्ता यावेळी अपघाताला आमंत्रण देत आहे.
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
सालेकसा : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेतीवाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
सौंदड : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी.पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते.
रस्त्याच्या दुर्दशेने अपघातांत वाढ
तिरोडा : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा तर झालीच, मात्र त्यापेक्षा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून चालताना जीव मुठीतच घेऊन चालावे लागते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
आमगाव : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.