गोंदिया : प्रसूतीसाठी आधी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आदिवासी महिलेवर उपचार योग्यरित्या न झाल्याने प्रसुती होताच अवघ्या काही तासातच नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी गंगाबाई रुग्णालयात घडली. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच नवजात बालक दगावल्याचा आरोप सचिन तिलगाम (२८) रा.साईटोला (गोरेगाव) यांनी लावला आहे. गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील आदिवासी महिला माया सचिन तिलगाव (२३) या महिलेला प्रसुतीसाठी २ मे रोजी सकाळी कुºहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रात सदर महिलेला एक दिवस ठेवण्यात आले.
मात्र रुग्णालयाला हाताळता येत नसल्याने येथील डॉक्टरांनी सदर महिलेला ३ मे रोजी रात्री गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात हलविले. यावेळी महिलेवर लगेच उपचार करणे आवश्यक होते. मात्र रुग्णालयातील अधिकार्यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप सदर महिलेचा पती सचिन तिलगाव यांनी लावला आहे. ३ मे रोजी रात्री बालिकेचा जन्म झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ४ मे रोजी दुपारी १२ वाजता सदर नवजात बालिका दगावली. या रुग्णालयातील आरोग्य सेवा ही जिल्ह्यातील आदिवासी व सामान्य नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असून आणखी किती आदिवासी व बालकांचा रुग्णालय प्रशासन जीव घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बालकांच्या मृत्यूसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या रुग्णालयातील कारभार सुधारलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)