ककोडी : येथील मंडईत मिठाई व गुपचूपचे सेवन करणाऱ्या ककोडीच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी महेश श्यामलाल कपूरडेहरिया (१२) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला रात्री ११.४५ वाजता ककोडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून चिचगड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.महेश कपूरडेहरिया (१२) व त्याचा सख्खा लहान भाऊ जयेश कपूरडेहरिया (९) हे इतर लोकांसह १५ मार्च रोजी ककोडी येथे मंडई पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी तेथे मिठाई व गुपचूपचे सेवन केले. १६ मार्चच्या सकाळी त्या दोन्ही भावंडांची प्रकृती बिघडली. उलटी, पेचिस व तीव्र ताप असल्यामुळे त्यांना ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री १२ वाजता त्यांना सुट्टी देण्यात आली. १७ मार्च रोजी पुन्हा त्याची प्रकृती खालावल्याने त्याला सकाळी ११ वाजता रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी २ वाजता त्याला सुट्टी देण्यात आली. मात्र पुन्हा रात्री ९ वाजता प्रकृती खालावल्याने त्याला ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. रात्री ११.३० वाजता ककोडीवरून चिचगड प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करण्यात आले. मात्र चिचगडला पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तर मृतक महेशचा लहान भाऊ जयेशच्या प्रकृतीत सुधार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून सतत प्रकृती खराब होत असतानाही योग्य उपचार न मिळाल्यामुळेच महेशचा मृत्यू झाला, असे मानले जात आहे. जर योग्यवेळी योग्य उपचार उपलब्ध करून देण्यात आले असते तर त्याचे जीवन वाचविले जावू शकत होते. या घटनेमुळे संपूर्ण आरोग्य विभाग संशयाच्या घेऱ्यात आहे. दरम्यान मृत मुलाच्या वडिलांनी कुणावरही आरोप-प्रत्यारोप केले नाही. त्यांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच कारण काय ते माहिती होईल व त्यानंतरच तक्रार करू, असे सांगितले.(वार्ताहर)गुपचूपमध्ये मामा तलावाच्यापाण्याचा उपयोग४१५ मार्च रोजी गोंडी समाजाची मंडई येथे होती. यात राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सीमावर्ती गाव व छत्तीसगड राज्याशी लागलेल्या गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते. मंडईत मिठाई व गुपचूप सेवन करणाऱ्यांचीच प्रकृती खराब झाली. ३४६ रूग्णांना विषबाधा झाली. त्यात पुन्हा १३६ रूग्णांची भर पडली. गुपचूपसाठी जवळील मामा तलावाचे पाणी उपयोगात आणले गेले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मृतकाच्या व्हिसेरा तपासणीसाठी नमूने फॉरेंसिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच योग्य माहिती मिळू शकेल. शक्यतो तपासणीनंतरच मिठाईमुळे विषबाधा झाल्याच्या कारणांची माहिती होईल.ककोडी आरोग्य केंद्राला जत्रेचे स्वरूप४रूग्णांची संख्या वाढतच असल्याने ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला जत्रेचे स्वरूप आले आहे. नागरिकांची गर्दी व आरडाओरड सुरू आहे. पंचायत समिती सदस्य गणेश सोनबुरई हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हुमणे यांच्या सतत संपर्कात राहून अतिरिक्त वैद्यकीय सेवेची मागणी करीत आहेत. सध्या डॉ. काळे, डॉ. विजय पटले, डॉ. अमोल बडवाईक व वैद्यकीय चमू सेवा देत आहेत. दरम्यान शिबिराला व आरोग्य केंद्राला माजी आ. रामरतन राऊत, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, विरेंद्र अंजनकर, प्रमोद संगीडवार, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, जि.प. सदस्य उषा शहारे, चिचगडचे ठाणेदार तिवारी व त्यांची चमू, राजू चांदेवार, मुरमाडीचे सरपंच रामदेव सोरीक, चिल्हाटीचे उपसरपंच रामजी हिरवानी, ज्ञानिकचंदन मलागार, संतूदास कारवा, चैनसिंग मडावी यांनी भेट दिली व रूग्णांच्या नातलगांची सात्वंना केली.चिल्हाटी येथे शिबिर४या घटनेमुळे आरोग्य विभागात हडकंप माजला आहे. त्यामुळे तत्काळ चिल्हाटी गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. शिबिरात शुक्रवारी दुपारी १ वाजतापर्यंत १३६ रूग्णांनी उपस्थित राहून आरोग्य सेवेचा लाभ घेतला. यात आर.एस. अग्रवाल ज्युनिअर कॉलेजच्या ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळत आहे. ककोडी येथील रहिवासी अनूप थाटमुर्रा (११) व चिल्हाटी येथील रहिवासी संतोषी गायकवाड (१५) यांना चिचगडच्या ग्रामीण रूग्णालयात, ककोडी येथील रहिवासी खेमू झपटमार (३५), मुरमाडी२२२ येथील रहिवासी तोमेश कुंवरदादरा (५) व चिल्हाटी येथील रहिवासी सुमित गुरूपंच (५) यांना देवरीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हे संपूर्ण क्षेत्र छत्तीसगडच्या सीमेशी लागून आहे. मंडईत छत्तीसगड येथील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आटरा, भकुर्रा, गेरूघाट, नांदिया व गेंदाटोला येथील रूग्णांना छत्तीसगडच्या वाघनदी तालुक्याच्या छुरिया येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तेथे ६० ते ७० रूग्णांचा उपचार सुरू आहे.
ककोडीतील विषबाधा प्रकरणात बालकाचा मृत्यू
By admin | Updated: March 19, 2016 01:53 IST