गोंदिया : खेळण्याच्या वयात क्राईम दूरदर्शन मालिका पाहण्याचा छंद बाळगणाऱ्या मुलाने गुन्हेगारी जगतात पाय रोवला. कुणाची वाईट संगत नसताना घरातील सुशिक्षित आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या त्या बालकाने सीआयडी मालिकेतून प्रेरणा घेऊन चक्क पोलिसांना हादरवून सोडले आहे. त्याच्या या कृत्यामुळे तो पुढे जाऊन नक्कीच दाऊदसारखा मोठा गुन्हेगार बनणार असेही बोलले जात आहे. तिरोडाच्या सहकार नगरात एका शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला मोहीत (बदललेले नाव) आजघडीला १५ वर्षाचा आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कलीम शेख यांच्या घराचे दार फोडून १७ ते १८ जानेवारीच्या रात्री त्यांच्या घरून पाच लाख ५० हजारांचे दागिणे पळविण्यात आले. या तपासासाठी रामनगरचे ठाणेदार किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे गेले असताना गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या १५ वर्षाच्या मुलाने कलीम यांच्या घरातील चोरी कुणी केली याची माहिती दिली. चोरी केल्यानंतर मोहीतने ते सोन्याचे दागिणे या रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या मुलाला आणून दाखविले होते. परंतु त्यावेळी ते दागिणे नकली समजून त्याला तिथे प्रतिसाद देण्यात आला नाही. मोहीत तेथून निघून गेला. परंतु रामनगर पोलीस या घटनेचा सुगावा घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले असता मोहीत नाव कळले. त्याच्या घरी गेल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. मोहीतने पोलिसांना घटनेची इत्थंभूत माहिती दिली. कलीम शेख यांच्या घरची चोरी एकट्यानेच केल्याची कबुलीही त्याने दिली. त्यांच्याच घरी असलेला दगड उचलून त्याने कुलूप तोडून कपाटातील दागिणे नेल्याची माहिती दिली. या प्रकरणात त्याची विचारपूस केल्यावर पोलिसांना बुचकळ्यात पाडणार अशी माहिती पुढे आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना किंवा सहवासही गुन्हेगारांचा नसताना मोठ्या घटनांना सहजरीत्या त्याने हाताळले. हे केवळ टीव्हीवर येणाऱ्या सीआयडी मालिका पाहिल्यामुळे आपल्याला सहज शक्य झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.आई-वडिलाशी वाद करून तो ८ जानेवारीला घरून निघाला. जेवणाची सोय म्हणून सिनेमा स्टाईलने मोबाईल पळवून बिर्याणी खाण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. रस्त्यावर किंवा रेल्वेस्थानकावर भेटलेल्या व्यक्तीला थांबवून मला माझ्या आई-वडीलांशी बोलायचे आहे असे सांगून त्याला फोन मागायचा. त्या व्यक्तीची नजर चुकवून क्षणार्धात तिथून तो निघून जातो. फोन मालकाने दुसऱ्याच्या फोनवरून त्या फोनवर फोन लावले तर मी पुणे वरून बोलतो आपण चुकीचा क्रमांक डायल केला असे सांगून फोन कापतो. मोहीत त्या व्यक्तीपासून १०० मीटर अंतरावरच राहून तिथल्या तिथे त्यांना चुकवून मोबाईल मारतो. चोरलेला तो मोबाईल बिर्याणी विकणाऱ्यांना देऊन ‘हा मोबाईल आपल्याकडे ठेवा, मला खूप भूक लागली आहे, मी थोड्यावेळानंतर पैसे आणून देईल व फोन घेऊन जाईल असे तो सांगून आपली भूक शमवायचा. त्याने भुकेसाठी सहा मोबाईल चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. रामनगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने पोलिसांनाही अनेकवेळा चुकीची माहिती देऊन त्रासवून टाकले. भादंविच्या अनेक कलमांची माहिती त्याला आहे. अल्पवयातच त्याने केलेले गुन्हे, गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बोलण्याची त्याची शैली, हातवारे व पोलिसांनाही बुचकळ्यात टाकणारे दिलेले खुलासे त्याला दाऊदच्या पावलावर पाऊल टाकून जात असल्याचे संकेत देत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तिरोड्याच्या सहकारनगरात तयार होतेय ‘छोटा दाऊद’
By admin | Updated: February 16, 2015 00:02 IST