रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)द्वारपोच योजनेअंतर्गत स्वस्त धान्य पोहचविण्याचे कंत्राट नांदेडच्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परंतु मुदतीच्या आत सिहोरा परिसरातील स्वस्त धान्य दुकानात अन्न धान्य पोहचविण्यात आले नसल्याने दुकानदारांच्या दारावर लाभार्थ्यांची थाप सुरु झाली आहे. यामुळे त्यांची चांगलीच गोची होत आहे.भंडारा जिल्ह्यात द्वारपोच योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, साकोली तथा लाखांदूर अशा ७ तालुक्यात अन्न धान्य पोहचविण्याचे कंत्राट नांदेड येथील महेश ओमप्रकाश होलानी यांना १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ आॅक्टोंबर २०१८ या कालावधी पर्यंत देण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने १६ आॅक्टोबर २०१५ ला करारनामा केला आहे. निर्धारीत कालावधीत अन्न धान्य पोहचविण्याची जबाबदारी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. द्वारपोच योजनेत ९ टन पर्यंत ट्रक्सने वाहतूक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान महिन्याचे १० तारखेपर्यंत अन्न धान्य स्वस्त दुकानात पोहचण्याची अट आहे. या शिवाय धान्याचे वाटप २० तारखेच्या आत झाले पाहिजे, असे शासनाने ठरवून दिलेले निकष असताना सिहोरा परिसरातील स्वस्त धान्य दुकानात अद्यापपर्यंत अन्न धान्य पोहचले नाही. यामुळे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदारांच्या दारावर रोज थाप देत आहे. त्यांचेवरच काही लाभार्थी धान्य वाटपात विलंब होत असल्याचे कारणावरून गंभीर आरोप करित आहेत. गावात आता तु-तु-मै-मै पर्यंत प्रकरण जाण्यास सुरुवात झाली आहे. तुमसर तालुक्यात धान्याची उचल करण्यावरुन हमाल आणि यंत्रणेत वाढ सुरु आहे. यांची माहिती गरजु लाभार्थ्यांना नाही. हे सांगताना दुकानदारांना माथापच्ची करावी लागत आहे. अनेकांनी गावाबाहेर जाणे सुरु केले आहे. महिनाभराकरिता प्राप्त झालेले अन्न धान्य संपले असल्याने लाभार्थी तथा गरजु रास्त अपक्षेने दुकानदारांना रोज विचारणा करित आहेत. परंतु निश्चित सांगता येत नाही असे एकचे उत्तर गावकऱ्यांना देण्यात येत असल्याने सतांपाची लाट निर्माण झाली आहे. तुमसर तालुक्यात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान व खापर स्वस्त धान्य दुकानदारांच्या दारावर फुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यात स्वस्त धान्य दुकानदारांचा दोष नसतांना गावात त्यानांच जबाबदार धरण्यात येत आहे. यामुळे या दुकानदारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गावकरी स्वस्त धान्यासाठी सातत्याने विचारणा करित असल्याने अनेकांनी भ्रमणध्वनी बंद करण्यातच धन्यता मानली आहे. यात दोष गरजु लाभार्थ्यांचा नाही. मुदतीच्या आत त्यांना धान्य प्राप्त होण्याची सवय आहे. निधीची जुळवाजुळव करावी लागत असल्याने त्यांना स्वस्त धान्याची चिंता आहे. तब्बल १० दिवसाचा अधिक कालावधी पूर्ण होत असतांना अन्न धान्य पोहचविण्यासाठी तोडगा काढण्यात आलेला नाही अशी माहिती मिळाली आहे. यामुळे यात नियम आणि शर्तीचे भंग करण्यात आले आहे. मुदतीच्या आत अन्न धान्याचे वाटप झाले नसल्यास स्वस्त धान्य दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी यंत्रणा पुढाकार घेत आहे. परंतु वादात नियमाचे भंग आल्याने कारवाई कुणावर होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले, अद्याप स्वस्त अन्न धान्याचे दुकानात पुरवठा करण्यात आला नाही.
नांदेडच्या कंत्राटदाराला स्वस्त धान्याचे कंत्राट
By admin | Updated: December 20, 2015 01:41 IST