रिजनल तिबेटियन युथ कॉंग्रेस : चीनच्या दडपशाही धोरणाचा निषेध अर्जुनी मोरगाव : जगातील सर्वात लहान राजकीय कैदी अशी ओळख असलेल्या पंचेन लामाच्या गेन्दुन छोक्यी निमा यांच्या सुटकेसाठी रिजनल तिबेटीयन युथ कॉंग्रेसतर्फे शनिवारी (दि.२५) सायंकाळी कँडल मार्च काढून त्यांच्या सुरक्षिततेसाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रार्थना करण्यात आली. चीनच्या दडपशाही धोरणाचा यावेळी तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी नार्गेलिंग तिबेटियन वसाहत गोठणगाव येथील शेकडो तिबेटियन बांधव उपस्थित होते. तिबेटचे आध्यात्मिक व लोकप्रिय नेते दलाई लामा यांनी गेन्दुन छोक्यी निमा यांची ११ वे पंचेन लामा म्हणून १४ मे १९९५ रोजी घोषणा केली. त्यांचा जन्म तिबेट मधील ल्हारी नाग्चू जिल्ह्यात २५ एप्रिल १९८९ रोजी झाला. त्यावेळी ते ६ वर्षांचे होते. त्यांच्या घोषणेच्या तीन दिवसानंतर १७ मे १९९५ रोजी चीनने त्यांना कुंटूबियांसह नजरकैद केले. ते जगातील सर्वात लहान राजकीय कैदी आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी देखील ते तुरूंगवासात असल्याचे चिनकडून सांगीतले जाते. लहान बालकांनाही आपल्या जुलमी धोरणाचे बळी घेऊन चीन हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करीत आहे. चीनच्या कैदेत असलेल्या बऱ्याच तिबेटियन राजकीय कैद्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे. ते नेमके कोणत्या तुरूंगवासात आहेत याची माहिती दिली जात नसल्याने त्यांचेवर अत्याचार तर केले नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली. २९ नोव्हेंबर १९९५ रोजी चीनने पंचेन लामा ऐवडी ग्यानकेन नोरवू या बालकाची नियुक्ती केली. तिबेटियन जनतेने ८ डिसेंबर १९९५ रोजी ही नियुक्ती अमान्य केली. पंचेन लामा गेन्दून छोक्यी निमा हे गेल्या २० वर्षांपासून कैदेत असताना देखील तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी चीन सरकारला प्रखरपणे तोंड देत असतील असा आशावाद तिबेटियन बांधव बाळगत आहेत. त्यांच्या सुखरूपता व सुटकेसाठी त्यांच्या जन्मदिवशी २५ एप्रिल रोजी कँडलमार्चचे आयोजन करण्यात आले. (तालुकाप्रतिनिधी)
११व्या पंचेन लामाच्या सुटकेसाठी ‘कँडल मार्च’
By admin | Updated: April 27, 2015 00:35 IST