रबीचा हंगाम कोरडाच : ७० हेक्टर शेती ओलिताअभावी तहानलेलीच विजय मानकर सालेकसा तालुक्यातील लटोरी-कोटजमुरा कालवा मागील ३३ वर्षापूर्वी तयार झाला. तेव्हापासून या कालव्याद्वारे कोटजमुरा-पोवारीटोला येथील शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या परिसरातील जवळपास १०० शेतकऱ्यांची ७० हेक्टर जमीन रबी हंगामात पडिक राहात आहे. एवढेच नाही तर पावसाळ्यातही वरथेंबी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हा कालवा बनवून शेतकऱ्यांची फक्त फसवणूकच झाली आहे, अशी भावना कोटजमुरा-पोवारीटोला येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातून दोन मुख्य कालवे निघाले आहेत. एक कालवा सालेकसा तालुक्यातील एक दोन गावांना सिंचित लाभ देताना पुढे आमगाव आणि गोंदिया तालुक्याला पुरेपूर सिंचनाचा लाभ देत आहे. दुसरा कालवा हा मध्यप्रदेशकडे वाहत असून जवळपास २९ कि.मी. पर्यंत सालेकसा तालुक्याच्या शेतीला सिंचनाचा लाभ देणारा आहे. नंतर या कालव्याचा पुरेपूर लाभ मध्यप्रदेशच्या लांजी, किरणापूर तालुक्यात मिळत आहे. या मोठ्या कालव्यातून काही छोटे कालवे काढण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांना सुद्धा याचा लाभ मिळतो. अशात एक शाखा वितरिका स्वरुपाचा कालवा मुंडीपार-लटोरी-कोटजमुरा परिसरासाठी मुंडीपारजवळून काढण्यात आला आहे. या कालव्याचा फायदा ब्राम्हणटोला, गोवारीटोला, मुंडीपार, कुनबीटोला, असईटोला येथील काही शेतकऱ्यांना मिळत असतो. त्याचबरोबर लटोरी परिसरातील शेतकऱ्यांना पुरेपुर लाभ मिळतो. वाकडा-तिकडा मार्गक्रमण करीत हा कालवा लटोरी ते कोटजमुरा, पोवारीटोलाच्या शेती शिवारापर्यंत गेलेला आहे. लटोरीनंतर जवळपास सात किलोमिटर अंतर पार करीत १०० शेतकऱ्यांच्या ७० हेक्टर जमिनीचा यातून ओलीताखाली समावेश करण्यात आला. आजपासून ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९७४ मध्ये हा कालवा बनविण्यात आल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. या गावामध्ये छोटे छोटे शेतकरी राहात असून त्यांच्या शेतीत धानपिकाशिवाय इतर दुसरे कोणतेही पीक घेता येत नाही. जेव्हा हा कालवा तयार करण्यात आला तेव्हा कोटजमुरा-पोवारीटोला येथील शेतकऱ्यांनी उत्तम शेती करण्याचे स्वप्न बघितले होते. परंतु मागील ३३ वर्षापासून आजपर्यंत स्वप्न कोणत्याच वर्षी पूर्ण होताना दिसले नाही. मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या कालव्याची जबाबदारी ही मध्य प्रदेश शासनाकडे असून कालवा दुरुस्ती व देखरेख तसेच पाण्याचे वाटप नियोजन हा सर्व अधिकार मध्य प्रदेश शासनाकडे आहे. परंतु महाराष्ट्राची सीमा संपेपर्यंत मध्यम येणाऱ्या सर्व वितरिकांना त्या-त्या क्षेत्राच्या हक्काच्या पाण्याबरोबर सोडण्यात येते व मध्य प्रदेशचे हक्काचे पाणी तिथे नेण्याचा प्रयत्न केला जातो. या कालव्याला पाणी सोडण्याचे काम पुजारीटोला धरणातून होत असले तरी येथे येणारा पारी हा मुळात सिरपूरबांध येथील वाघ जलाश्यातून दिला जातो. सिरपूर धरण हे महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असून या धरणाचा मोठा परिसर छत्तीसगड राज्यात मोडतो. छत्तीसगडची निर्मिती होण्यापूर्वी हे धरण संयुक्त मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने या धरणाचे पाणी वाघ नदीच्या माध्यमातून पुजारीटोला धरणात टाकून येथून एका कालव्याने मध्य प्रदेशकडे तर दुसऱ्या कालव्याने महाराष्ट्रात अशा प्रकारे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात याचा थेट फायदा मिळत राहीला. परंतु मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या कालव्याच्या पाण्याच्या वितरणाची समस्या नेहमीच काय होती. महाराष्ट्राची सीमा ओलांडण्यापूर्वीच अनेक ठिकाणी येथील पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत गेला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशलासुद्धा हक्काचे पाणी आवश्यक प्रमाणात मिळाले नाही. तसेच सालेकसा तालुक्यात सुद्धा छोट्या कालव्यांना पाण्याचे वितरण बरोबर न झाल्याने काही गावांना भरपूर पाणी तर काही गावांना काहीच नाही, अशी अवस्था राहिली. मुंडीपार, लटोरी, कोटजमुरा या कालव्यातून जाणारे पाणी लटोरीपर्यंत समाधानकारकरित्या शेतकऱ्यांना प्राप्त होते. परंतु कोटजमुरा परिसरात पोहोचतापोहचता मध्येच संपून जाते आणि कोटजमुरा, पोवारीटोला येथील शेतकऱ्यांची जमीन तहानलेलीच राहते. शेवटी त्यांची शेती म्हणायला तर ओलीताखाली आहे, परंतु खऱ्या अर्थाने वरथेंबी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. - पाणी का पोहोचत नाही? कोटजमुरा पोवारीटोला परिसरात पाणी का पोहोचत नाही याचे कारण शोधताना अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. तरीही त्यातील प्रमुख कारणांमध्ये एक तर कालव्याची नेहमी देखभाल दुरूस्त झाली नाही. त्यामुळे पाणी पुढे न जाता जिथे तिथे कालव्याच्या फुटलेल्या भागातून वाया जाते. त्याच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष पाटबंधारे विभागाने दिलेले नाही. दुसरे कारण असे की लटोरी या गावाजवळ या कालव्याला फाटा देण्यात आला असून कोटजमुरा परिसरात आवश्यक तेव्हा पाणी लेटोरी परिसरातील शेतकरी जाऊ देत नाही. मोठ्या प्रमाणावर पाणी आपल्याकडे वळवून ठेवतात आणि ओव्हर फ्लो झालेले पाणी नाल्याने वाहून जाते. तिसरे म्हणजे कोटजमुरा-पोवारीटोला परिसरातील शेती वाळवंट व मुरमाळ स्वरुपाची असल्याने त्या भागात पाण्याची पूर्तता होत नाही. पाणी पुढे वाहून जाण्यापूर्वी शोषून जाते.
३३ वर्षांपासून कालवा निकामी
By admin | Updated: March 19, 2017 00:27 IST