गोंदिया : फुलझडी कापडांवर पडून कापडांनी पेट घेतल्याने घरातील सर्व सामान जळून खाक झाल्याची घटना येथील जनता कॉलनीतील रहिवासी ब्रजभानसिंह ठाकूर यांच्या घरी गुरूवारी (दि.१२) सायंकाळी ७.४५ वाजतादरम्यान घडली. या घटनेत ठाकूर यांचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले.पोलीस विभागात कार्यरत ब्रजभानसिंह ठाकूर जनता कॉलनीत मनिराम कटरे यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांचा नातू दिवाळी असल्यामुळे फटाके फोडत होता. फटाके फोडताना त्याने फुलझडी फेकली असता ती घरातच कापडांवर पडली व कापडांनी पेट घेतला. काही वेळातच आग एवढी भडकली की बघता-बघता घरातील सर्व सामान जळून खाक झाले. लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली असता पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे ब्रजभानसिंह यांचा मुलगा संदीप यांचा २७ तारखेला विवाह असून त्याच्या लग्नासाठी खरेदी केलेले सर्व कपडे, दागिने रोख व त्यासह घरातील अन्य सामान जळून भस्म झाले आहे. ठाकूर यांच्या घरातील आगीनंतरचे चित्र बघताच आगीच्या रौद्ररूपाची कल्पना करता येते. या घटनेमुळे मात्र ठाकूर यांचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तोंडावर लग्न कार्य असताना घडलेल्या या प्रकारामुळे ठाकूर कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर तुटून पडल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
विवाहाच्या तोंडावर घर भस्मसात
By admin | Updated: November 14, 2015 02:01 IST