तिरोडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी,घरफोडी हे प्रकरणे अत्यंत सामान्य झाले आहे. अवैध दारू प्रकरणे ज्याप्रमाणे नियंत्रणात आणण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले. पण चोरी,घरफोडीमधील गुन्हेगारांना पकडण्यात तिरोडा पोलिसांना अद्यापही यश आले नाही. या तपास कार्याकडे पोलीस दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. रविवारी सकाळी पुन्हा तिरोडा येथे घरफोडीची घटना घडली.
सध्या कोविडमुळे लॉकडाऊन सुरू आहे. जमावबंदीच्या आदेशाचे पालन सुरू आहे. असे असताना पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पोलीस ठाण्याच्या जवळील परिसरातच चोरांनी आपला डाव साधला. धीरज डोमाजी भेलावे रा. तिरोडा यांच्या रायल स्टोर्स या काॅस्मेटिक दुकान १८ एप्रिलच्या मध्यरात्री दरम्यान फोडून चोरी करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे दुकानाचे टिन कापून ही चोरी करण्यात आली आहे. या चोरीमध्ये अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे कॉस्मेटिक व हातघडी, गिफ्ट वस्तू आणि नगदी तीन हजार रुपये लंपास झाले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. धीरज भेलावे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस शिपाई बर्वे करीत आहेत.