दोष कुणाचा ? : शासकीय तिजोरीवर नाहक भुर्दंडअर्जुनी मोरगाव : अधिकाऱ्यांना स्वतंत्र निवास असावे अशी शासनाची योजना आहे. येथे खंडविकास अधिकाऱ्यांसाठी सहा महिन्यांपूर्वी बंगला तयार करण्यात आला. मात्र ते वास्तव्यास अनुत्सूक आहेत. १३ लाख रुपये खर्च करुन बंगला बांधण्यात आला असला तरी शासनाकडून मात्र घरभाडे भत्याची उचल संबंधित अधिकारी करतात. रिकाम्या बंगल्यावर विनाकारण विजेची आकारणी होते. या पद्धतीने शासकीय तिजोरीला चूना लावण्याचा प्रकार येथे बघावयास मिळत आहे.प्राप्त माहितीनुसार स्थानिक पंचायत समितीच्या खंड विकास अधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले. यासाठी १३ लाख रुपये खर्च झाले. हे बांधकाम ६ महिन्यापूर्वी पूर्ण झाले. बांधकाम झाल्यानंतर विभागातर्फे खंड विकास अधिकाऱ्यांना कार्यालयीन डाकद्वारे पाच महिन्यापूर्वी ताबा पावती देण्यात आली. मात्र अद्यापही ताबा घेण्यात आला नाही. निवासस्थान असेल तर शासन संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्याला घरभाडे भत्ता देत नाही. मात्र येथे अजबच प्रकार दिसून येत आहे. एकीकडे नवीन बंगला आहे तर दुसरीकडे शासकीय पैशाची उधळपट्टी सुरू आहे. या निवासस्थानासाठी महावितरणतर्फे विद्युत मिटर बसविण्यात आले. निवासस्थान रिकामे असले तरी शुल्क आकारणी होते. एकदा बिल भरले नाही. म्हणून पुरवठा खंडीत करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. रिकाम्या निवासस्थानावर विनाकारण विद्युत खर्च सुरूच आहे. यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे हे येत्या १ ते २ महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे ते अल्पावधीसाठी निवासस्थानात जाण्यास उत्सुक नसल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे बांधकाम विभाग ताबा पावती देऊन मोकडे झाले आहे. कारणे काहीही असले तरी या प्रकारामुळे शासकीय तिजोरीला मात्र चुना लागत आहे. निवासस्थान तयार असलेल्या दिनांकापासून शासनाच्या होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी निश्चित करुन वसुली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)निवासस्थानात अपूर्ण सुविधा-कोरडेबांधकाम विभागाने ताबा पावती पाठविली याचा अर्थ ताबा घेणे असा होत नाही. त्यात का ही अपूर्ण सुविधा आहेत. याबाबतची शाखा अभियंत्यांना सूचना दिली आहे. त्यांना समक्ष अंदाजपत्रक घेऊन बोलावले आहे. अंदाजपत्रकात नमूद असलेल्या बाबींप्रमाणे सर्व सुविधा आहेत किंवा नवाही ते तपासून पाहू. अपूर्ण बाबींसह जर ताबा घेतला तर भविष्यात त्या बाबी तशाच अपूर्ण राहणार अशी माहिती खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी दिली.अंदाजपत्रकाप्रमाणे सर्व सुविधा - देशमुखखंडविकास अधिकाऱ्यांसाठी बांधकाम केलेल्या निवासस्थानात अंदाजपत्रकाप्रमाणे सर्व सुविधा आहेत. ताबा पावतीमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या नमूद आहेत. ताबा पावती पाठवून पाच महिने लोटले. दरम्यान भेटीसाठी आलो मात्र खंडविकास अधिकारी उपलब्ध झाले नाही. अंदाजपत्रकात ताराचे कुंपण आहे ते केले. सिमेंटची संरक्षण भिंत नाही, पाणी पुरवठ्याची सुविधा जेवढी होती तेवढी आहे. बोअर मारले पण यशस्वी झाले नाही. जुन्या बोअरवरुन तात्पुरर्ती सुविधा उपलब्ध होऊ शकते. पाईपलाईन टाकलेली आहे ते राहायला तयार असतील तर जोडणी करून देता येईल, अशी माहिती शाखा अभियंता देशमुख यांनी दिली.
बंगला तयार असूनही घरभाडे भत्याची उचल
By admin | Updated: April 23, 2015 00:42 IST