पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव : नगरसेवकासह पाच जण ताब्यात गोंदिया : नवीन बायपासकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या जागेवरील घरांचे बांधकाम तोडण्यासाठी गुरूवारी येथील छोटा गोंदिया परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाने ही मोहीम राबवून अनेक घरे बुलडोजरने जमीनदोस्त केली. विशेष या मोहिमेला विरोध दर्शविण्यासाठी पुढे येणाऱ्या नगरसेवकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी ११ वाजता पोलीस, महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले व काही न सांगता अतिक्रमण हटविण्याची मोहीम त्यांनी सुरू केली असे तेथील नागरिकांनी सांगितले. तीन जेसीबी मशिनच्या मदतीने येथील घरांना पाडण्यात आल्याचे चित्र बघावयास मिळाले. छोटा गोंदियातील अतिक्रमण काढण्यात येत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रूंगटा यांच्या कॉम्प्लेक्सचे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, उपविभागीय अभियंता रमेश बाजपेई यांच्यासह अन्य अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धडकले होते. या मोहिमेचा विरोध करण्यासाठी पुढे आलेल्या नगरसेवक विष्णू नागरीकर, बालाराम सोनवाने, त्यांची पत्नी मिरा सोनवाने, घनश्याम भेलावे व त्यांची पत्नी पुष्पा भेलावे यांना पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले होते. विशेष म्हणजे अतिक्रमण हटविण्याच्या या मोहिमेत कित्येकांच्या घरावरील छत हिरावल्याने नागरिकांत चांगलात रोष दिसून आला. त्यांना घरातील सामान कुठे ठेवायचे असा प्रश्न पडल्याचेही दिसले. आपले राहते घर हिरावले जाणार असल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या. मात्र बघता-बघता बुलडोजर एक-एक घर जमीनदोस्त करीत पुढे सरकत गेला. (शहर प्रतिनिधी)डीएलआरच्या चुकीची शिक्षा रिंगरोडकरिता सन २००८ मध्ये जागेची मोजणी करण्यात आली होती. मोजणी क्रमांक ११८/०८ मध्ये ज्यांच्या जागेची मोजणी करण्यात आली त्यावेळी रेकॉर्डवर बाबूलाल कटरे, लोकेश मेश्राम, श्यामलाला मेश्राम, सुरेश मेश्राम व भरत वाघमारे यांचे नाव होते. मात्र या लोकांनी आपली बहुतांश जागा विद्यमान जमीन मालकांना विकली होती व त्यावर कच्चे-पक्के घर बांधले. मात्र डिएलआरने कार्यालयात बसूनच या जमिनीची मोजणी केल्याने त्यांना वास्तविकता माहिती नव्हती व आता त्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागली, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.प्रशासनाकडून ही जागा शासनाच्या अधिकारात आल्यानंतर (सन २००८) नागरिकांनी घरे बनविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र येथील रहिवाशांकडे सन १९९० नंतरच्या घरकर व वीज बिलाच्या पावत्या आहेत. शासनाने जुन्या मालकांच्या नावावर १५ लाख ६६ हजार ५५९ रूपयांचा मोबदला काढला. जुने जमीन मालक उपविभागाय कार्यालयातून मोबदला आणतात व विद्यमान मालकांना रिकाम्या हाताने परत यावे लागत असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला.का झाली कारवाई?शहरातील मरारटोली ते फु लचूर व तेथून कारंजापर्यंत नवीन बायपास (रिंग रोड) तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर शासनाने २४ कोटी रूपये खर्च केले आहे. छोटा गोंदिया परिसरातील नागरिकांनी मागील काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील वाहनांमुळे त्यांच्या जेवनात धूळ येत असल्याने सांगत रस्त्यावर काटेरी झाडे टाकून वाहतूक बंद पाडली होती. तर दुसरीकडे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० डिसेंबर रोजी नोटीस देऊन येथील लोकांना १५ दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. सोबतच अतिक्रमण न हटविल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. या प्रकरणाला घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांत चर्चा सुरू होती. अखेर गुरूवारी (दि.११) अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्त काढण्यात आला.
बायपासवर चालला बुलडोजर
By admin | Updated: February 12, 2016 02:05 IST