आमगाव : शहराच्या विकास कामांतर्गत रस्ता सिमेंटी करणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला १२ मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यातच जिल्हा परिषदेच्या गाळ्यांवर बुलडोझर चालविण्यात आले. यामुळे मात्र, येथील लघू व्यावसायिक अडचणीत आले असून, त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.
सध्या रस्त्याच्याकडेला दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम सुरू झाले आहे. याकरिता अनेक दुकानांवर बुलडोझर चालवून अतिक्रमण काढण्यात येत आहे. याच अतिक्रमण हटाव मोहिमेत जिल्हा परिषदेच्या गाळ्यांवर बुलडोझर चालले, त्यामुळे या गाळ्यांत व्यवसाय करणारे लघू व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे व्यावसायिक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे काही वर्षांपूर्वी ११ गाळे तयार करण्यात आले, परंतु नियमानुसार कोणतेही बांधकाम न करता रस्त्यावर अतिक्रमण करून, जिल्हा परिषदेचा लाखो निधी खर्च करून गाळे बांधण्यात आले. आता याच बांधकामावर अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत बुलडोझर चालविण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेचे लाखोंचे नुकसान तर झालेच, पण या गाळ्यांत व्यवसाय करणारेही बेरोजगार झाले आहेत. या सर्व प्रकरणाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.