गोंदिया : जिल्ह्यातील बहुतांश गावांत बोगस डॉक्टरांचा उपद्व्याप वाढला आहे. ज्यांना डॉक्टरकीचा ड ही समजत नाही, असे महाभाग डॉक्टरकीचे दुकान थाटून गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक बेरोजगार अर्धवट ज्ञानातून डॉक्टरकीचा व्यवसाय थाटत आहेत.एखाद्या नामांकित डॉक्टरकडे वर्ष दोन वर्ष काम करून इंजेक्शन देण्याचे काम ते करतात. सर्वसाधारण आजारावर चालणाऱ्या औषध गोळ्यांची माहिती आत्मसात करून नंतर हेच बेरोजगार डॉक्टर झाल्याचा आव गावात दाखवतात. ज्या गावात वैद्यकीय सेवेचा अभाव आहे अशा गावात आपली दुकाने थाटतात. काही गावात तज्ज्ञ डॉक्टर असूनही गोरगरीब जनता पैशाच्या अडचणीमुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडे न जाता अल्प दरात सेवा देणाऱ्या अशा बोगस डॉक्टरकडे जाऊन उपचार करवून घेतात. अल्प दरात सेवा देणारा हा महाभाग खरोखरच डॉक्टर आहे किंंवा नाही, याकडे गरीब जनता लक्ष न देता अशा डॉक्टरांकडून थातूरमातूर उपचार करवून घेतात. काही बोगस डॉक्टर औषध दुकानातून पाच पंचवीस रुपयाच्या गोळ्या, औषध विकत घेऊन गरीब जनतेच्या उपचाराच्या नावाखाली विकतात. औषध दुकानदारही अशा बोगस डॉक्टरांना औषध विकतात. याचाच अर्थ औषध विक्रेतेही कायद्याला मुठमाती देऊन दुकानदारी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णाला ज्या औषधांची गरज असते ती औषध न देता झोलाझंडी बोगस डॉक्टर भलत्याच गोळ्या व औषधी देतात. कोणत्याही आजारावर चालणाऱ्या पेनकिलर देऊन ते मोकळे होतात. याची किंमत किती याचीही माहिती रूग्णांना वा त्यांच्या नातेवाईकांंना नसते. अल्प खर्चात औषधोपचार करवून घेणे हाच एकमेव मार्ग गरीब जनतेला असतो. यात झोलाझंडी बोगस डॉक्टरांचा हा एक उदरनिर्वाहाचा धंदा बनला आहे. आपण अशिक्षीत असून गरीब जनतेच्या आयुष्याशी खेळत आहोत, याची त्यांना तिळमात्र लाज वाटत नाही. दहावी बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्याचा आव आणून समाजात मिरवित असल्याचे चित्र दिसत आहे. काही वर्षापूर्वी बोगस डॉक्टरांना पकडण्याची मोहीम पोलीस विभागाने राबविली होती. या बोगस डॉक्टरांमुळे अनेक रूग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. सरकार आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. वृत्तपत्र व टेलिव्हीजन यांच्यावर सरकार गोरगरीब जनतेच्या आरोग्यासंबंधी बांधिलकी दाखवते. पण प्रत्यक्षात खेड्यांच्या भारत देशातील ग्रामीण भागात सरकारच्या योजना कुचकामी ठरत आहेत. याचाच परिपाक म्हणून अशा बोगस डॉक्टरांचे फावते. जिल्ह्यात ९०५ गावे असून ही गावे ५५६ ग्रामपंचायतीत विभागल्या गेली आहेत. या गावांची लोकसंख्या पाहता गोंदिया जिल्ह्यात हजारो बोगस डॉक्टर अपला व्यवसाय चालवितात. औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० अंतर्गत बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्या जाते. मात्र आजपर्यंत किती जणांवर ही कारवाई झाली हे त्या संबंधित विभागालाच माहिती असावी. कारवाईच्या नावाखाली अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानत आहेत. कायद्यानुसार कारवाई झाली असती तर बोगस डॉक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले राज्य वाढवू शकले नसते. बोगस डॉक्टरांचा किंंवा अशा बोगस डॉक्टरांनी रुग्णाला लिहून दिलेल्या चिठ्ठीच्या आधारे औषध कसे काय विकतात याचीही संबंधित विभागाने चौकशी करावी. अशा या आरोग्य सेवेसारख्या गंभीर विषयाकडे संबंधित विभागाने गांभिर्याने पाहून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे धाडस करावे, अशी मागणी जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By admin | Updated: October 21, 2014 22:54 IST