गोंदिया : विद्युत बिलापोटी जास्तीचा भरणा केलेली रक्कम विद्युत विभागाने समायोजित केली नाही. तसेच मार्च २०११ ते फेब्रुवारी २०१२ पर्यंतच्या कालावधीचे विद्युत देयक दुरूस्त करून न देणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला आहे.येशुराम मार्तंड बडोले रा. श्रीनगर (गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तळ मजल्यावर दोन व वरच्या मजल्यावर दोन खोल्या अशी त्यांच्या घराची रचना आहे. दोन्ही मजल्यांसाठी स्वतंत्र वीज मीटर असून ग्राहक क्रमांक वेगवेगळा आहे. २४ फेब्रुवारी २०११ रोजी वीज कंपनीने जुना मीटर बदलवून नवीन मीटर दिले व जोडणीसाठी एकच सर्व्हिस वायर दिले. त्यामुळे एका वीज मीटरचा वापर अत्यंत कमी होत असतानाही दोन्ही मीटरवर सारखीच रिडिंग येत होती. विद्युत देयकेही सारख्याच रकमेची येत असल्याने बडोले यांनी तोंडी व लेखी तक्रार केली. परंतु वीज विभागाने दोन्ही मीटरच्या जोडण्या वेगळ्या करून न देता पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली. त्यामुळे बडोले यांनी १४ आॅगस्ट २०१२ रोजी आठ हजार रूपये भरून दिले. मात्र अतिरिक्त विद्युत आकारणी थांबविण्यात आली नाही. त्यांनी सुधारित बिल देण्याची वारंवार मागणी केली. परंतु सुधारित बिल देण्यात न आल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावे लागले व त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.न्यायमंचाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकूण कारणमिमांसा केली. ग्राहक बडोले यांनी विद्युत मीटरच्या जानेवारी २०११ च्या देयकामध्ये एकूण वीज वापर पाच युनिट दर्शविला. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१० या कालावधीत दर महिन्याचा वीज वापर १८ युनिट पेक्षा जास्त नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये वापरलेले युनिट पाच व सात आहेत. परंतु मार्च २०११ च्या बिलामध्ये एकूण युनिट १३० दर्शविले. तसेच मार्च २०११ ते डिसेंबर २०११ या काळात दर महिन्यात वापरलेले युनिट २०० युनिटच्या वर दाखविले आहेत. तसेच ग्राहक बडोले यांनी १४ आॅगस्ट २०१२ रोजी १५ हजार ९३८ रूपयांच्या एकूण बिलापैकी आठ हजार रूपये भरले. परंतु विद्युत विभागाने दोन्ही मीटरच्या वापरलेले युनिट व आकारलेले बिल कुठलेही स्टेटमेंट दिले नाही. तसेच बिल देण्याची व रक्कम समायोजित करण्याची वारंवार मागणी करूनही ती मान्य न करणे ही सेवेतील त्रुटी असल्याचे न्यायमंचाचे मत आहे.ग्राहक बडोले यांची तक्रार अंशत: मान्य करण्यात आली. ग्राहकाच्या प्रत्यक्ष विद्युत वापरावर बिलाची आकारणी करून सुधारित देयक द्यावे. त्याचा भरणा झाल्यावर खंडित वीज पुरवठा सुरू करावा. बडोले यांनी भरलेले आठ हजार रूपये पुढील बिलात समायोजित करावे. शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने विद्युत विभागाला दिले. (प्रतिनिधी)
चुकीचे बिल पाठविणाऱ्या विद्युत वितरण कंपनीला झटका
By admin | Updated: February 5, 2015 23:11 IST