आमगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कोरोना काळात रक्तदान शिबिरे हाेऊ शकली नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी रक्तदात्यांनी स्वत:हून पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज असल्याचे मत तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भरत वाघमारे यांनी केले.
स्थानिक राजयोग कॉलोनी येथे शौर्य दिवस, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड.दर्शना रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाखांदूरचे प्रा.अनिल कानेकर व आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तोषिका पटले, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य धर्मरक्षित टेंभुर्णे, आनंद बंसोड, मंगला गोंडाणे, राजेंद्र बडोले, डॉ.अभय बोरकर, विद्या शिंगाडे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी समता सैनिक दलाच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर घेण्यात आले. बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, केंद्रप्रमुख ए.आर. शेंडे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक योगेश रामटेके यांनी मांडले. संचालन विद्या साखरे व प्रज्ञा भगत यांनी केले.