देवरी : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना ६ जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्याचा आरोप भाजप ओबीसी मोर्चाने केला आहे. ओबीसींना सरकारने केवळ आश्वासने दिल्याचा निषेध व्यक्त करीत बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून संताप व्यक्त केला.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर व नागपूर येथील निवडणुका जाहीर झाल्या. सरकारने इम्पिरिकल डेटा न्यायालयाला दिला असता तर ओबीसींना निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती, सरकारला हेतूपुरस्पर ओबीसींचे आरक्षण काढून घ्यायचे होते. सरकारने मागासवर्गीय आयोग नेमूनही कोणतीही कार्यवाही केली नाही. ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पध्दतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले. राज्यात ओबीसींचे आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल येरणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सचिव यादोराव पंचमवार, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, लक्ष्मण नाईक, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉ. जितेंद्र रहांगडाले, तालुका महामंत्री योगेश ब्राम्हणकर, गजानन शिवणकर, प्रेमलाल मुंगणकर, माया निर्वाण, रचना उजवणे, तनुजा भेलावे, दिशांत चन्ने, पीयूष दखने, देवेंद्र गायधने, हितेश हटवार, धीरज तिरपुडे यांचा समावेश होता.