वामनराव चटप यांचा पत्रपरिषदेतून आरोप :९ आॅगस्टला गडकरी निवासस्थानी ठिय्या भंडारा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विदर्भातील जनतेला मते मागितली, विदर्भातील जनतेनी त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवित भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. मात्र सत्तेत येताच भाजप सरकारमधील मंत्री तसेच पदाधिकारी वेगळा विदर्भ हा त्यांच्या अजेंड्यावरच नसल्याचे सांगतात. हा एक प्रकारे विदर्भातील जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे. भाजप सरकारने विदर्भातील जनतेची शुद्ध फसवणूक केली असून त्याचा जाब विचारण्याकरिता येत्या ९ आॅगस्ट क्रांती दिन रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील वाड्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी आज दि.१२ जुलै रोजी भंडारा येथील साई मंगल कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा देता, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केव्हा करणार, विदर्भातील विजेचे लोडशेडींग केव्हा संपविणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च प्लस ५० टक्के मुनाफा एवढे हमी भाव केव्हा देता, नागपूर करारानुसार तयार झालेल्या विदर्भातील चार लाख नौकऱ्यांचा बॅकलॉग केव्हा भरणार आदी प्रश्नांचा जवाब विचारण्यासाठी ९ आॅगस्टला हजारो विदर्भवादी गडकरीच्या वाड्यावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही सांगितले. दोन वर्ष लोटूनसुद्धा गडकरी वेगळ्या विदर्भाबाबत शब्दही काढायला तयार नाही. याप्रसंगी अॅड. वामनराव चटप, राम नेवले, अॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, अरुण केदार, डॉ. दिपक मुंडे, अॅड. आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, तुवार हट्टेवार, अॅड. शिशिर वंजारी, नितीन तुमाने, धनंजय सपकाळ, अभिजित वंजारी, सारंग तिडके, मयुर निंबार्ते आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
भाजपने विदर्भातील जनतेला फसविले
By admin | Updated: July 15, 2016 02:16 IST