सालेकसा : कडक उन्हाचा फटका, त्यावर दिवसाढवळ्या घराला अचानक आग लागल्यामुळे तालुक्यातील दुर्गटोला येथील पुरुषोत्तम कोर यांचे घर पाहता पाहता भस्मसात झाले.शुक्रवारी (दि.२८) मक्काटोला ग्राम पंचायतअंतर्गत दुर्गुटोला येथील पुरुषोत्तम कोरे यांच्या घराला सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण मकान आगीत सापडले. गावातील लोकांना माहिती मिळताच गावकऱ्यांनी जळत्या घराकडे धाव घेतली आणि आग विझविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. परंतु घराला लागलेल्या आगीचा भडका एवढा प्रचंड झाला होता की तो विझविणे अशक्य झाले. दरम्यान गावातील काही लोकांनी अग्नीशमन दलाशी संपर्क केला. काही वेळात अग्नीशमन दलाचे कर्मचारी तयारीसह पोहोचले व आग विझविली परंतु तोपर्यंत घराला आगीपासून वाचविण्यासारखे काहीच उरले नव्हते. परंतु आग विझविल्यामुळे गावातील इतर घरांना आग लागल्यापासून नक्कीच वाचविता आले.आग कशामुळे लागली याचे कारण माहित झाले नाही. घरात बाजूच्या धाब्यावर तणस सुद्धा भरलेली होती. त्यामुळे धोक्याने आग लागली की कोणी लावली हे स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची बातमी कळताच सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, मक्काटोलाचे सरपंच आशा खांडवाय, तलाठी काकडे, तुकाराम बोहरे, भुमेश्वर मेंढे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पिडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन गावकऱ्यांनी केले. घर जळून खाक झाल्यामुळे लाखोचे नुकसान झाले असून नेमके कितीचे नुकसान झाले याचे मुल्यांकन केल्यावर माहिती पडेल. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गुटोला येथील घर भस्मसात
By admin | Updated: April 30, 2017 00:48 IST