ऑनलाइन लोकमत
खातिया, दि. 27 - गोंदिया-बालाघाट (मध्यप्रदेश) या आंतरराज्यीय मार्गावर एका इंडिका कारने प्रवासी घेऊन जाणा-या ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटोमधील दोन जण जागीच ठार झाले तर आठ लोक जखमी झाले. हा अपघात आंभोराजवळ घडला. अपघातानंतर संतप्त लोकांनी इंडिका कारला पेटवून दिले.
ही घटना सकाळी ८.४५ च्या सुमारास घडली. धडक देणारी कार गोंदियातील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेची (एनएफटीआय) होती. दरम्यान कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जमावाला शांत करण्यासाठी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकासह वाहतूक नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी आंभोरा येथील एमएच ३५/२८१३ या ऑटोचा चालक किशोर रामटेके (वय ४०) हे आंभोरा बस थांब्यावर ऑटोमध्ये प्रवासी भरत असताना बिरसी विमानतळाजवळील एनएफटीआयच्या कर्मचाºयांना घेऊन गोंदियाकडे येत असलेल्या इंडिकाने त्या ऑटोला जबर धडक मारली. त्यामुळे वाहन चालक किशोर रामटेके व आर्यन नावाचा ९ वर्षाचा मुलगा घटनास्थळीच मरण पावले तर ऑटोमधील आठ लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले.
या अपघातानंतर संतप्त जमावाने इंडिका कारला पेटवून दिले. काही वेळातच ही कार पूर्णपणे जळाली. नागरिकांचा संताप पाहून कारचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह पोलीस पथकाने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाहतूक बराच वेळपर्यंत खेळंबून होती. वाहतूक नियंत्रण पथकाने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे रावणवाडी परिसरातील सर्व प्रवासी ऑटोचालकांनी आपले ऑटो बंद ठेवले.