- एक वर्षापासून अनुदान नाही : दुकानदारांचा पैशांसाठी तगादा
परसवाडा : गोंदिया जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन विहीर योजनेचा उदोउदो करण्यात आला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोरोना काळात मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यास सांगीतले. तिरोडा लघू पाटबंधारे विभागामार्फत १०४ विहिरींचे काम करण्यात आले. ४६ विहिरींचे काम बाकी राहिले आहे. शेतकऱ्यांनी कोरोना काळात अंदाज पत्रकाच्या किमतीपेक्षा जास्त दराने सिमेंट, लोहा, रेती, गिट्टी दुकानदाराकडून घेतली. आता वर्ष होत असून, शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, तर दुसरीकडे दुकानदार पैसे मागत असल्याने योजनेतील लाभार्थी अडचणीत आले आहेत.
विहिरीचे काम सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ असलेली रक्कम मजुरांना खोदकाम करण्यासाठी दिली. त्यानंतर, उसनवारीवर साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र, दोन लाख ४८ हजार रुपयांपैकी एक रुपयाही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. दुकानदार आता दुप्पट व्याज लावत असून, पैशांसाठी घरी येऊन तगादा लावत आहे. आता दुकानदारांचे उधारीचे पैसे द्यावे की कुटुंबीयाचा उदरनिर्वाह, लग्न, शिक्षण व दैनंदिन खर्च करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांचे आधीच शासनाने कंबरडे मोडले आहे. महाआघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांची बिघाडी झाली आहे. इंदोरा बु. येथील रूपकुमार चेतन अंबुले यांनी, या वर्षी पीक पूर व रोगाने गेेले, कसेतरी वाचलेले पीक खाण्यासाठी झाले. अशात शेतकऱ्यांचे संकट कमी झाले नसून उलट कर्जबाजारी झाले. दुकानदार पैशांसाठी तगादा लावतो, आता काय करायचे, यासाठी संबंधित विभागच जबाबदार असल्याचे सांगितले. लघू पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता चौधरी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी शासनाकडून पैसे आले नाहीत. प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. मार्चपूर्वी पैसा येऊ शकतो, आता शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे त्वरित देऊ, असे सांगितले.