सडक अर्जुनी : आदिवासी मुलींचे वसतिगृह सडक-अर्जुनी येथे विद्यार्थिनीची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सडक अर्जुनीच्या वतीने कुलूपबंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दखल घेवून विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर केल्या.आदिवासी मुलींचे वसतिगृह सडक-अर्जुनी येथे काही दिवसांपासून गैरसोय होत आहे. महिला गृहपालांकडून सुविधा पुरविल्या जात नाही. अशा तक्रारी आदिवासी विद्यार्थी संघाने अप्पर आयुक्त नागपूर आयुक्त आदिवासी विकास नाशीक, प्रधान सचिव आदिवासी विभाग मुंबई यांच्याकडे लेखी स्वरुपात केल्या होत्या.या संदर्भात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाने गृहपालाची त्वरित बदली करावी, या मागणीसाठी आदिवासी मुलींचे वसतिगृह सडक- अर्जुनी येथे कुलूपबंद व उपोषण आंदोलन १४ आॅक्टोबरला करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून रामटेके, कोरोडे आणि टेंभूर्णेकर यांनी आंदोलनाला भेट देवून मागण्या विषयी चर्चा केली. वसतिगृहातील मुलींना सुविधा देण्यात येईल असे आश्वासन देवून महिला गृहपाल पेरकर यांची बदली करुन लगेच त्यांच्या जागी एस.एस. बावनथडे यांना पाठविण्यात आले. विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनीत आचले, रुकेश कुरसुंगे, सुप्रिया भोयर, सुषमा काटेवार, सचिन कुधीर, संदीप नरेटी यांनी नेतृत्व केले. आंदोलनात ५५ मुली व १२ मुले सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)
आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
By admin | Updated: October 18, 2015 02:09 IST