गोंदिया : कोरोनामुळे दाढी, कटिंग करणाऱ्या सलून चालकांवरही संक्रात आली आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर दुकान उघडून बसणाऱ्या सलून दुकानदारांकडे ग्राहक फिरकत नव्हता. आता पुन्हा महिनाभरासाठी ही दुकाने बंद केल्याने नागरिकांना घरातच दाढी-कटिंग करावी लागणार आहे. परंतु या व्यवसायावरच जीवन जगणाऱ्यांच्या समोर मोठे आव्हान आहे.
पूर्वीच्या तुलनेत ग्राहक कमी, खर्च अधिक यामुळे आधीच संकटात असलेल्या नाभिकांना आता कोरोनाने जगणे कठीण केले आहे. कोरोना होईल या भीतीने अनेक ग्राहक घरीच दाढी करीत होते. परंतु पुन्हा कोरोनाचा कहर झाल्याने आता महिनाभर सलून बंद ठेवण्यात आले आहे. आधीच्या तुलनेत आता ५० टक्के रोजगार राहिला नसतांना पुन्हा एक महिना बंद करण्यात आल्याने सलून व्यावसायिक संकटात पडले आहेत.
......
आता घर कसे चालवायचे
कोट
कोरोनाच्या आधी सलूनमध्ये ग्राहकांना दाढी, कटिंग करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु दुकानदारांना आता ग्राहक येण्याची वाट पाहावी लागत आहे. पुन्हा एक महिन्याच्या बंदीने रोजगारच हिरावला आहे.
- जितेंद्र मेश्राम, सलून कामगार पदमपूर
........
मागच्या वर्षीपासून आम्ही आमचे जीवन कसे जगत आहोत ते आम्हालाच ठाऊक. ना कुणाची मदत ना सहानुभूती कधी लॉकडाऊन तर कधी कडक निर्बंधाच्या नावावर आमचा रोजगार बुडत आहे. मुलांचे शिक्षण व घर चालविण्यासाठी काय करावे हे समजत नाही.
- डेलन खडसिंगे, सलून कामगार, आमगाव
........
पहिल्या लॉकडाऊननंतर ग्राहक ५० टक्क्यापेक्षा कमी झाले पुन्हा गाडी रुळावर येत असताना आता कोरोना वाढला आणि महिनाभर दुकान बंद ठेवण्याचे आदेश निघालेत. या महिनाभरात आम्ही पोट कसे भरावे, हा प्रश्न आमच्या समोर आहे. कोरोनाने आमचा रोजगार संपविला आहे.
- राजीव गणोरकर, सालेकसा रोड, आमगाव
........
कोरोनाच्या संकटामुळे सलून व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड ओढावली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. आणि सर्व व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सलून सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली. परंतु कोरोनाच्या संसर्गाची धास्ती घेऊन ग्राहक कमी येऊ लागले होते. पुन्हा एक महिना दुकान बंद ठेवण्याचे आदेश म्हणजे आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रकार आहे.
- अशोक चन्ने, प्रांत उपाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ
.......
बॉक्स
भाडे निघणेही अवघड
सलून चालविण्यासाठी अनेक लोकांनी भाड्याने खोली घेतली आहे. परंतु त्या भाड्याच्या खोलीचा महिन्याला देय असलेले भाड्याचे पैसेही निघणे कठीण झाले आहे. उलट मदत करण्यापेक्षा आता पुन्हा महिनाभर दुकान बंद राहणार असल्याने हा भुर्दंड कसा सहन करावा या विवंचनेत सलून व्यावसायिक आहेत.
...........
शहरात एकूण केस कर्तनालय- २५०
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या- १९०