दिन विशेष : विसरभोळेपणामुळे होतात त्रस्त, आजार टाळण्यासाठी राहा कार्यक्षमगोंदिया : बदललेली जीवनशैली, घरातील प्रत्येक व्यक्तीचे आत्मकेंद्रित होणे आणि त्यातून घरातील वृद्धांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण यातून सध्या ‘अल्झायमर’ हा आजार वृद्ध नागरिकांमध्ये बळावत आहे. आधी पाश्चिमात्य देशातच आढळणारा हा आजार आता भारतासारख्या देशातही हळूहळू पाय पसरत आहे. विसरभोळेपणा हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. साधारणत: वयाच्या सत्तरी-पंचाहत्तीनंतर या आजाराची लक्षणे दिसून लागतात. या आजारात स्मृतिभ्रंश होतो. अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितलेली गोष्टही त्यांना आठवत नाही. आपण जेवन केले का, कपडे घातले का किंवा बाहेर फिरायला गेलो तर घरी जाण्याचेही ते विसरू शकतात. अनेक वेळा तर स्वत:चे नाव आणि पत्ताही ते विसरतात. त्यामुळेच अशा रुग्णांच्या खिशात नेहमी त्यांचे नाव आणि पत्ता असलेली डायरी किंवा चिठ्ठी ठेवावी लागते. सध्या मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोनमुळे प्रत्येकाचे आयुष्य आत्मकेंद्रीत होत आहे. युवकांसोबत मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपापल्या विश्वात रमताना दिसतात. त्यामुळे घरातील म्हाताऱ्या व्यक्तींसोबत बोलायला, त्यांचे सुख-दु:ख जाणून घेण्याचीही कोणाला फुरसत नसते. यामुळेच ही म्हातारी मंडळी एकाकी होऊन जातात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कार्यरत राहात नसल्यामुळे अखेर त्यांना हा आजार जडतो. या आजारात मेंदूच्या पेशी कमजोर होतात. त्यात आकुंचन पावतात. यात शरीर काम करीत असले तरी मेंदू काम करीत नाही. विशेष म्हणजे यावर कोणतीही औषधी काम करीत नाही. जी काही औषधी उपलब्ध आहे ती अतिशय महागडी असून ती सुद्धा काम करेलच याची शाश्वती नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. (जिल्हा प्रतिनिधी)
सावधान! वृद्धांमध्ये वाढतोय अल्झायमर...
By admin | Updated: September 20, 2014 23:52 IST