संपामुळे कामकाज ठप्प : मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने गोंदिया : शासनाकडून जन विरोधी बँकींग सुधार व ट्रेड युनियन अधिकारांच्या उल्लंघनाचे प्रयत्न केल्याच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी (दि.२८) राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला. या बंदमध्ये सर्व शासकीय बँकांचा समावेश होता. परिणामी बँकांचे कामकाज ठप्प पडले होते व त्यामुळे सामान्य नागरिकांची पंचाईत झाली होती. नोटबंदी दरम्यान कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळे नंतरही केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा, सर्व बँकांत कर्मचारी व अधिकाऱ्यांची त्वरीत नियुक्ती करण्यात यावी, बँक कर्मचाऱ्यांच्या आगामी वेतत पुनरीक्षणाची प्रक्रीया त्वरीत सुरू करावी, पूर्वीची पेंशन योजना लागू करावी, केंद्र शासनानुसार राज्य शासनाकडून स्वीकृत अनुकंपा नियुक्ती योजना लागू करावी, सर्व संवर्गातील भर्ती करण्यात यावी, नोटबंदीच्या काळात बँकांकडून करण्यात आलेल्या खर्चाची शासनाकडून पूर्तता करण्यात यावी, पाच दिवसीय बँकींग त्वरीत सुरू करावी, जाणून बँक कर्जाची परतफेड न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आदी मागण्यांसाठी युनाईटेड फोरम आॅफ बँक युनियन्सच्यावतीने मंगळवारी (दि.२८) हे राष्ट्रव्यापी संप पुकारला होता. या संपात सर्वच शासकीय बँकांचा सहभाग होता. त्यामुळे खासगी बँकांना सोडून अन्य शासकीय बँकांना कुलूप लागले होते. संप दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी आपापल्या बँकापुढे एकत्र येवून बैठका घेतल्या. यात बँक आॅफ इंडियाच्या रेलटोली स्थित मुख्य शाखेसमोर कर्मचारी व अधिकारीही एकत्र आल्याचे दिसून आले. यात येथील बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर मुख्य व्यवस्थापक सुरेशकुमार त्रिवेदी, संघाचे अध्यक्ष जी.भास्करराव, सचिव चंद्रप्रकाश रूहीया, रूपचंद तळवेकर, खुशाल नेवारे, रूपेश चव्हाण, सी.टी.साखरे, ए.टी.कटरे, जे.जी.शिंदे, ललीत रहांगडाले, डी.बी.राऊत, रोशन भोयर, अमोल खोब्रागडे, रितेश पांडे, जी.पी.पिंपरे व अन्य उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी) सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना फटका बॅकांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाला मात्र फटका सहन करावा लागला. सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार संपामुळे प्रभावीत झाले. मात्र व्यापाऱ्यांचे व्यवसायीक आर्थिक व्यवहार अडकल्याने त्यांना जास्त त्रास सहन करावा लागला. संपामुळे बँका बंद ठेवण्यात आल्या व त्यामुळे नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. कित्येक बँकांनी गेटवर बँक बंदची सूचनाही लावलेली दिसले.
बँक कर्मचाऱ्यांचा राष्ट्रव्यापी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:20 IST