बोंडगावदेवी : समाजामध्ये परिवर्तन होऊन मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आठ टिकल्याची बाई या सामाजिक प्रबोधनात्मक नाटकाचे सादरीकरण निमगाव येथे करण्यात आले. वर्तमान स्थितीमध्ये दिवसेंदिवस मुलींचा जन्मदर कमी होत आहे. मनुष्यप्रधान कुटुंब पद्धतीमध्ये वंशाचा दिवा म्हणून मुलांचे आकर्षण जास्त आहे. समाजाच्या जुन्जा परंपरामध्ये परिवर्तन व्हावे, कुटुंबात मुलीसंबंधी जिव्हाळा, स्नेहाचा पाझर फुटावा म्हणून शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून मुला-मुलीमधील भेदभाव दूर सारण्याचा सचोटीने प्रयत्न केला जात आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने निमगाव येथे मुंबईच्या श्री वझिरा गणेश निर्मित मृणालिनी बेंद्रे दिग्दर्शीत आठ टिकल्यांची बाई या मुली विषयी गोडवा निर्माण करणाऱ्या प्रबोधनात्मक नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. निमगाव येथील दुर्गा चौकात आयाजित नाटकाचे उद्घाटन सरपंच देवाजी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिथी संदीप कापगते, माधोराव गायकवाड, डॉ. कुंदन कुलसुंगे, संजय कापगते उपस्थित होते. मृणालिनी बेंद्रे, दिग्दर्शन दिनार केकुसकर, नेपथ्य प्रदीप पाटील, प्रकाश परब, पार्श्वसंगीत अरुण कानविंदे, सुत्रधार अमित तांबे यांच्या निर्मितीने तयार करण्यात आलेल्या नाटकामधून स्त्री भृणहत्या रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. समाजात मुली-मुलांमध्ये करण्यात येत असलेला भेदभाव, मुलगी वाचवा यासारखे साक्षात देखावे दाखवून नाटकातील पात्रांना न्याय देण्यात आला. आजच्या वर्तमानामध्ये मुलींची संख्या वाढविणे कितपत फायदेशीर आहे हे संवादामध्ये ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. मुलगी जन्माच्या अगोदरच तिचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, स्त्री भ्रूणहत्या करू नका असा मार्मीक हितोपदेश नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना करण्यात आला. संचालन डॉ. कुंदन कुलसुंगे, प्रास्ताविक आरोग्य सेवक ए.टी.सातारे तर आभार आरोग्य सेविका पी.एस.शहारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका वाय.टी.सोनवाने, आशा गटप्रवर्तक रेखा कोसरे, रंजना राखडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर) मोफत आरोग्य तपासणी शिबिर गोंदिया : भगवान महावीर जयंतीनिमित्त ९ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ वाजता दरम्यान सकल जैन समाजातर्फे मोफत आरोग्य शिबिर सिव्हील लाईन येथील पॅथो माईक्रो व्हिजन येथे करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी नाटकाच्या प्रयोगातून प्रबोधन
By admin | Updated: April 9, 2017 00:12 IST