‘लोकमत’च्या सर्वेक्षणातील सूर : ९५ टक्के नागरिकांना वाटते सामाजिक भान जपावेनरेश रहिले गोंदियागणेशोत्सवाला धार्मिक स्वरूप असले तरी त्यामागे सामाजिक परंपराही आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकाना जागृत करण्याचे काम याच गणेशोत्सवाच्या माध्यमातून झाले. मग आताही हा उत्सव साजरा करताना सामाजिक भान राखण्यात गैर काय? याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गोंदिया शहरात सहा प्रश्नांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. त्यात प्रत्येक मंडळाने सामाजिक भान राखलेच पाहीजे, अशी भावना व्यक्त करतानाच मंडळांकडून होणारा अनावश्यक खर्च, ध्वनीप्रदूषण याला आळा घालावा, असे मत व्यक्त केले.एकीडकडे गणेशोत्सव सुरू झाला तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. जिल्ह्यातही यावर्षी शेतकऱ्यांची स्थिती पाहीजे तशी चांगली नाही. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी उत्सवावर आवश्यक असलेला खर्च जरूर करावा, पण टाळता येण्यासारखा, अनावश्यक खर्च न करता त्यातून वाचणारे पैसे दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करून द्यावेत, आणि समाजापुढे आदर्श स्थापित करावा, असा सूर लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून उमटला.गणेशोत्सवात मंडप डेकोरेशन, लायटिंग, मिरवणुकीसाठी डिजे, गुलाल अशा अनेक बाबींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. वास्तविक यातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे वाटते का? या प्रश्नाला ९५ टक्के लोकांनी होकार दिला आहे. पाच टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर दिले. गणेशोत्सवासाठी जबरीने वर्गणी गोळा करणे योग्य आहे का, या प्रश्नाला ८२ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात म्हणणारे १८ टक्के आहेत. म्हणजेच जबरीच्या वर्गणीला नागरिकांचे समर्थन नाही हे दिसून येते.गणेशोत्सावादरम्यान १० दिवस विविध मंडळांकडून कोणत्या पध्दतीचे कार्यक्रम व्हावेत या प्रश्नावर ६५ टक्के लोकांनी धार्मिक कार्यक्रमाला पसंती दिली. २९ टक्के लोकांनी सामाजिक कार्यक्रम तर केवळ ६ टक्के लोकांनी मजोरंजनात्मक कार्यक्रम व्हावेत, असे मत व्यक्त केले. मंडप, लायटींग व मिरवणुकांवर होणाऱ्या वारेमाप खर्चाचे समर्थन करता का? या प्रश्नाला १५ टक्के लोकांनी समर्थन दिले. मात्र तब्बल ५० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. काही प्रमाणात कराणारे समर्थन देणारे ३५ टक्के लोक आहेत. विर्सजनादरम्यान डिजे वाजविताना होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण असावे, असे वाटते का याला ८६ टक्के लोकांनी होकार दिला. तर १४ टक्के लोकांनी काही प्रमाणात डिजेचे समर्थन केले. मात्र पूर्णपणे डिजेच्या ध्वनीप्रदुषणाला कोणीही समर्थन दिले नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सिनेमाची गाणी वाजवून नृत्य केले जाते, त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य लोप पावते का, या प्रश्नाला ४१ टक्के लोकांनी होकार दिला. २८ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले तर ३१ टक्के लोकांनी काही प्रमाणात असे उत्तर आहे. यावरून बहुतांश लोकांना विसर्जन मिरवणुकीतील सिनेमाची गाणी आणि त्याच्या तालावर चालणारा धांगडधिंगा नको आहे.गोंदियावासीयांच्या या भावनांचा जिल्ह्यातील समस्त गणेश मंडळं विचार करतील आणि त्यानुसार अपेक्षित बदल करतील का? हे लवकरच दिसून येईल.
खर्च टाळा; दुष्काळग्रस्तांना मदत करा
By admin | Updated: September 20, 2015 02:11 IST