गोंदिया : सरपंच पतीच्या त्रासाला कंटाळून ग्राम विकास अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी (दि.२४) घडलेल्या या प्रकारानंतर ग्राम विकास अधिकारी खासगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे. तर त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्राच्या आधारे त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देत सरपंच पतीवर कारवाईची मागणी केली आहे. शिवकुमार चैतराम रहांगडाले (रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यांचे नाव आहे.
शिवकुमार रहांगडाले यांच्या पत्नी अंतकला शिवकुमार रहांगडाले (५०, रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, शिवकुमार रहांगडाले हे मागील ४ वर्षांपासून ग्राम कुऱ्हाडी येथे ग्राम विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुधवारी (दि. २४) त्यांनी दोनदा उलटी केल्याने त्यांना गोंदिया गायत्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यावर डॉक्टरांनी अंतकला यांना त्यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. शिवकुमार यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शुक्रवारी (दि.२६) अंतकला यांना उपचाराच्या दृष्टीने शिवकुमार यांनी कोणते विष प्राशन केले ते बघण्यास सांगितले. यावर त्यांनी घरी जाऊन शिवकुमार यांची बॅग बघितली असता त्यात त्यांना शिवकुमार यांनी लिहिलेले पत्र मिळून आले. त्यात शिवकुमार यांनी मागील १ वर्षापासून सरपंचांचे पती मार्तंड पारधी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे लिहिले आहे. चुकीचे बिल देऊन पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करीत असून तसे न केल्यास वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करून खोटी कामे करण्यासाठी दबाव आणतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्या करीत असल्याचे पत्रात नमूद आहे.
या पत्राच्या आधारे अंतकला यांनी शनिवारी (दि. २७) गोरेगाव पोलिसांत तक्रार देत शिवकुमार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पारधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर ठाणेदार मेहकरे यांच्याशी या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी तक्रार आली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.