गोंदिया : येथील हनुमान नगर रिंग रोडमधील रहिवासी अभियंता नौशाद शेख यांच्या घरावर १० ते १५ जणांनी प्राणघातक हल्ला केला. तसेच घरातील सामान-साहित्यांची तोडफोड करून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवार (दि.७) रोजी घडली, असे अभियंता नौशाद शेख यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले.प्राप्त माहितीनुसार, मुबारक रशिद शेख, मुस्ताक रशिद शेख, शबनम मुबारक शेख, कार ड्रायव्हर व इतर १० ते १५ जणांनी नौशाद शेख यांच्या घरावर हल्ला केला. लोखंडी रॉड व दगड मारून घराची तोडफोड केली. तसेच दरवाजा व खिडकी तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना वाचविले व रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चौकशीनंतर पोलिसांनी मुबारक शेख, मुस्ताक शेख, शबनम शेख व कार चालकाला अटक केली व भादंविच्या कलम ४५२, ३३६, ४२७, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रसिद्धीपत्रानुसार, मुबारक शेख व शबनम शेख बनावटी स्वयंसेवी संस्था चालवित असून शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लावत आहेत. याची तक्रार सहायक धर्मादाय आयुक्त गोंदिया यांना पुराव्यासह करण्यात आली होती. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याचाच वचपा काढण्याच्या उद्देशाने त्यांनी अभियंता नौशाद शेख यांच्या घरावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अभियंत्याच्या निवासस्थानावर हल्ला
By admin | Updated: June 13, 2015 00:57 IST