गोंदिया : मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द केलेल्या त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्याचा पहिला हप्ता म्हणून २२ हजार रुपयांची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या सहायक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई गोंदिया येथे मंगळवारी (दि.२८) नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सुदाम लक्ष्मण रोकडे असे लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधकाचे नाव आहे.
तक्रारदाराचा मासेमारी व्यवसाय आहे. त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. रामनगर रजी. नं. ६६८ या संस्थेसोबत उत्पादीत मासे खरेदी विक्रीचा करारनामा केला. हा करारनामा कालावधी सन २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे.
काही कारणास्तव संस्थेने त्यांचा करारनामा मुदतपुर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवर चौकशी करण्याकरीता सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे (वय ५६ वर्ष) सहकारी संस्था गोंदिया तथा अतिरीक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा याने तक्रारदाराला यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली.
मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या लाच मागणीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुरच्या पथकाने ९ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान सुदाम रोकडे यांनी तक्रारीची चौकशी करण्याकरीता तक्रारदाराला १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील पहिला हप्ता २५ हजार रुपयांपैकी २२ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली.
२८ ऑक्टोबर रोजी लाचेचा सापळ्याचा संशय आल्याने रोकडे यांनी मागणी केल्याप्रमाणे लाच रक्कम स्विकारली नाही. सदर लोकसेवक यांनी आपले पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रक्कमेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधिक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे,राजकिरण येवले, पोहवा. अश्मिता भगत, पो.शि. हेमराज गांजरे, पो.शि. होमेश्वर वाईलकर, प्रफुल भातुलकर, चालक पोशि राजेंद्र जांभुळकर यांनी ही कारवाई केली.