अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील महालगाव शिवारातील उदाराम मुंगमोडे यांच्या शेताजवळील वीज डीपीचे फ्यूज वारंवार उडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या कार्यालयात सूचना देऊनही कानाडोळा करण्यात येत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
महालगाव शेत शिवारातील शेतीला इटियाडोह धरणाच्या कालव्यातून सिंचनाचे पाणी उपलब्ध होते. महालगाव शिवारात कालव्याच्या कडेला मुंगमोडे यांचे शेत आहे. शेताजवळ महावितरण कंपनीची डीपी आहे. ही डीपी सताड उघडी असते. डीपीमध्ये ग्रीप नाहीत व फ्यूज उडाल्यावर तारांचे फ्यूज लावून तात्पुरती उपाययोजना केली जाते. तार गरम झाल्यावर वारंवार फ्यूज उडतात. यामुळे जीवितालासुद्धा धोका संभवतो. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनाने कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, वारंवार फ्यूज उडत असल्याने वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरविणे अवघड होते. तक्रार नोंदविल्यानंतर लाईनमन येतात व तात्पुरती उपाययोजना करतात. परत फ्यूज उडतो व अशात कितीवेळा तक्रारी करायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. या प्रकारामुळे शेतपिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने स्थायी उपाययोजना करावी अथवा नवीन डीपीची व्यवस्था करून देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.