गोंदिया : प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी व त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांच्यामध्ये कार्यालयातच शाब्दिक हमरीतुमरी झाली होती. त्यामुळे पर्यवेक्षकांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी हे सर्व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हा क्षयरोग केंद्रात कार्यरत वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक हे रखडलेले वेतन, भत्ते त्यांना लागणारे शासकीय स्टेशनरी व प्रयोगशाळा साहित्य यासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांच्या कक्षात गेले होते. त्यांनी एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंतचे क्षयरोग केंद्रातील कर्मचाऱ्यांचे भत्ते व सन २०१४ च्या सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांना विचारपूस केली. यावर क्षयरोग अधिकाऱ्यांनी त्यांना अपमानित करून कक्षाबाहेर निघून जाण्याचे फर्मान सोडले होते. आणि नेमक्या त्याच कारणामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात शाब्दिक हमरीतुमरी झाली. यानंतर वासनिक यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी हे सर्वच कर्मचाऱ्यांना ेनेहमीच मानसिक त्रास देतात, अशी तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांना लिखीत स्वरूपात केली होती. परंतु संबंधिक अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहून सर्व कर्मचाऱ्यांनी पुन्हा शुक्रवारी १९ डिसेंबरला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्याकडे प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांचे प्रभार काढण्यात यावे व त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी या प्रकरणाच्या चौकशी अहवाल तयार करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून डॉ. गोवर्धन दुधे यांची नियुक्ती केली आहे. सदर चौकशी अधिकारी डॉ. दुधे हे बुधवारी २४ डिसेंबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांची चौकशी करून तसा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करणार आहेत. यानंतर प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे प्रभार काढले जाते किंवा नाही, याकडे क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक
By admin | Updated: December 23, 2014 23:06 IST