नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी पिंपळगाव येथे २५ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने, अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खांबी गावातील नागरिकांची कोरोना तपासणी गुरुवारी गावात करण्यात आली. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटीच्या वैद्यकीय चमूने केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. नाकाडे सामुदायिक आरोग्य अधिकारी, भारद्वाज आरोग्य सेवक, परिचारिका शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तसेच आशा कार्यकर्त्यांनी या तपासणी कार्याला सहकार्य केले. जिल्ह्याबरोबरच अर्जुनी मोरगाव तालुक्यातही कोरोना हळूहळू पाय पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी गोष्टींचे पालन करावे, असे डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी कळविले आहे.