गोंदिया: कोरोनाचा संसर्ग झाल्याने सर्वच प्रकारच्या व्यापारावर गंभीर परिणाम पडला, परंतु दारू विक्रीच्या व्यवसायावर कोरोनाचा कसलाही प्रभाव पडलेला दिसत नाही. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असतानाही मागील दहा महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी ९७ लाख ९६ हजार लिटर दारू पोटात रिचवली आहे. या दारूची किंमत ४०० कोटी रुपयांची सांगितली जाते.
कोरोनाच्या काळात लोकांकडे पैसे नाहीत अशी ओरड सुरू होती. किराणा, औषध अशा जीवनावश्यक वस्तूंना वगळता इतर सर्वच व्यापार ठप्प पडलेत. पण दारूच्या व्यवसायावर फरक पडला नाही. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०२० या महिन्याचा लॉकडाऊन कालावधी सोडून मे २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात ७७ लाख ४७ हजार ७९५ लिटर देशी दारू, १३ लाख ४३ हजार ७२५ लिटर विदेशी दारू, ६ लाख ९४ हजार ८१७ लिटर बीअर तर १० हजार ६५ लिटर वाईन असा एकूण ९७ लाख ९६ हजार ४०२ लिटर दारूची विक्री करण्यात आली. या काळात ५.६९ टक्के देशी दारूच्या विक्रीत घट झाली आहे. तर ८.२१ टक्के विदेशी दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे. बीअर ३१.५७ टक्के कमी झाली आहे. वाईन २०.६१ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.