रावणवाडी : कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आठवडे बाजारावर निर्बंध लावण्यात आले असून त्यानुसार जवळील ग्राम काटी येथील ग्रामपंचायतने याबाबत दवंडी दिली होती. त्यानुसार रविवारी (दि. ४) येथील भाजीबाजार भरला नव्हता मात्र जनावरांचा बाजार भरला होता. एकंदर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची अवहेलना करण्यात आल्याचे आढळले.
जिल्ह्यातही कोरोना आपले पाय पसरत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून आठवडे बाजारावर बंदी लावली आहे. त्यानुसार, काटी येथे भरणारा भाजीबाजार रविवारी (दि. ४) बंद होता. मात्र जनावरांचा बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. यात जनावरांना उभे करण्यासाठी १०-१० फुटांवर डब्बे तयार करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने येथे धडक दिली असता बंदचे आदेश आमच्यासाठी नसल्याने सांगत व्यवस्थापकाने आपली बाजू झटकली. याप्रसंगी बाजारात सुमारे २००-२५० जनावर व त्यांचे मालक उपस्थित होते. यावर येथील ठाणेदारांनी धडक देऊन बाजार बंद केला. या प्रकारामुळे आता आठवडे बाजार बंदीचे आदेश काढताना त्यात जनावरांच्या बाजाराचा विशेष उल्लेख करावा लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेथे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम तुडविले जात आहे.