गोंदिया : पाच वर्ष संसार थाटल्यानंतर पती व पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला १० दिवसानंतर परत आणण्यासाठी गेलेल्या पतीने रस्त्यातच तिचा काटा काढला. माहेरून पतीसोबत निघालेली ती महिला सासरी पोहोचलीच नसल्याने चौकशी सुरू झाली. तेव्हा पाच दिवसानंतर तिचा मृतदेह धोबीटोला येथील टेकडीवर कुजलेल्या अवस्थेत आढळला. माधुरी नरेश मेश्राम (२६) रा. चिल्हाटी असे मृत महिलेचे नाव आहे. पाच वर्षापूर्वी तिचे लग्न चिल्हाटी येथील नरेश मेश्राम याच्यासोबत झाले होते. १५ दिवसापूर्वी त्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे ती राहायला माहेरी गोंदिया येथे आली. परंतु माहेरून परत आपल्या घरी नेण्यासाठी तिचा पती नरेश मेश्राम हा १ आॅक्टोबर रोजी गोंदियाला आला. त्याने आपल्या पत्नीला घरी नेतो म्हणून सासुरवाडीच्या लोकांना सांगितले. तिला घरी घेऊन गेला नाही. तिचा मृतदेह रविवारी धोबीटोला येथील टेकडीवर कुजलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती काढल्यावर तिची ओळख पटली. माधुरी बेपत्ता असल्याची नोंद घरच्यांनी दिली नाही. माधुरीचा भाऊ राहूल याने ती बेपत्ता असल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसांकडे केली होती. या घटनेत तिचा पतीने तीच खून करून मृतदेह लपविला होता. असा संशय पोलिसांना आहे. माधुरीचा भाऊ राहूल राजेंद्र उके (२२) रा. गोंदिया यांच्या तक्रारीवरून सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी भादंविचा कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेपासून नरेश मेश्राम फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करून नरेश मेश्रामला ताब्यात घेतले. तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
महिलेचा खून करून मृतदेह टेकडीवर टाकला
By admin | Updated: October 6, 2014 23:14 IST