२५ जानेवारीची चोरी : गोदामातून पळविल्या होत्या ३०० पोतीदेवरी : जवळील ग्राम भागी येथील धान व्यापाऱ्यांच्या गोदामातून धानाच्या ३०० पोती चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अखेर पोलिसांनी पकडले. २५ जानेवारी रोजी मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या या घटनेत तिघांचा समावेश असून धान व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे ही चोरी उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे.प्राप्त माहितीनुसार, येथील धानाचे व्यापारी हनुमानप्रसाद उर्फ माणिक हेमराज अग्रवाल यांचे येथून एक किलोमीटर अंतरावरील ग्राम भागी येथे गोदाम आहे. २५ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामाचे कुलूप तोडून सुमारे अडीच लाख रूपये किमतीच्या धानाच्या एचएमटी प्रजातीच्या ३०० पोती चोरून नेल्या होत्या. २६ जानेवारी रोजी अग्रवाल गोदामात गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला व त्यांनी लगेच पोलिसांत तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे घटनेच्या रात्री अग्रवाल यांच्या एका मित्राने त्यांच्या गोदामा समोर कत्थ्या रंगाचा ट्रक उभा असल्याचे बघितले होते. त्याच ट्रकला अग्रवाल यांनीही ७ फेब्रुवारी रोजी अग्रसेन चौकात बघितले होते व त्यावर शंका आल्याने त्यांनी ही बाब पोलिसांना सांगीतली. पोलिसांनी लगेच सुत्र हलवून ट्रक चालक-मालक रूकेश पतीराम कापगते (रा.कोहळीटोला) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावर कापगते याने चोरीची कबूली देत रत्नदीप धर्मेंद्र मेश्राम (रा.रजेगाव) व अतूल फुलचंद वंजारी (रा.बोरगाव) यांच्यासह ट्रक एमएच १८/एम २९४१ मध्ये धानाच्या पोती भरून वडसा येथे नेल्याचे सांगीतले. मात्र तेथे धानाची विक्री न झाल्याने सौंदड येथील एका व्यापाऱ्याला धान विकल्याचेही सांगीतले. यावर पोलिसांनी सौंदड येथील व्यापाऱ्याकडून धानाच्या ३०० पोती जप्त केल्या आहेत. तसेच तिघांना अटक केली असून त्यांच्या विरूद्ध भादंवीच्या कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अखेर ‘ते’ धान चोरटे गजाआड
By admin | Updated: February 10, 2016 02:12 IST