लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील नामदेव बोरकर यांच्या राहत्या घरात अचानक बिबट शिरला. दरम्यान याची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. त्या बिबट्याला पकडण्यासाठी नवेगावबांध येथील वन्यजीव जलद बचाव दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत बिबट घरामध्ये ठाण मांडून होता. वनविभागाच्या रेस्कू पथकाने अगदी दरवाजासमोर पिंजरा मांडून ठेवला. पथकातील सर्व सहकार्यांनी तब्बल ३ तास जोखीम पत्कारून शर्तीचे प्रयत्न केले. अखेर तीन तासाच्या थरार नाट्यानंतर सोमवारी (दि.२३) रात्री उशिरा त्या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यास बचाव दलास यश आले. गावातील शेतशिवार लागून असलेल्या घरांकडे बिबट्याने दोन दिवसांपासून मोर्चा वळविला होता. घटनेच्या एक दिवसापूर्वी गोठ्यातील एक बकरी फस्त केली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास घराशेजारील आब्यांच्या झाडावर बिबट बस्तान मांडून बसला होता. अचानक शेजारच्यांना झाडावर बिबट्याचे दर्शन झाले. गावात याची वार्ता पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी केली होती. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने आपला मोर्चा इतरत्र हलविण्याच्या हेतूने झाडावरून उडी घेऊन पळ काढण्याच्या तयारीत असताना चक्क त्याने नामदेव बोरकर यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे संधी साधून थेट घरात शिरून सज्ज्यावर ठाण मांडले. याची वार्ता गावाच्या व परिसरातील पंचक्रोशीत पसरली. बघ्यांची गर्दी विक्रमी वाढली. शांततेच्या दृष्टीने अर्जुनी-मोरगाव पोलिसांना गावात बोलविण्यात आले. क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे यांनी वरिष्ठांना कळवून नवेगावबांधच्या वन्यजीव जलद बचाव दलाल पूर्ण साहित्यानिशी घटनास्थळी बोलविण्यात आले. यानंतर बिबट बंदिस्त ऑपरेशन सुरू झाले.
बिबट्याला सोडले जंगलात - बिबट्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी बघ्यांनी एकच झुंबड घातली. क्षणाचाही विलंब न लावता पिंजऱ्यात कैद झालेल्या त्या बिबट्याला गावातून इतरत्र वाहनातून हलविण्यात आले. तेव्हा मात्र सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. घरातून पकडण्यात आलेला बिबट कालीमाटी जंगल परिसरात सोडण्यात आल्याचे समजते. परिसरात चान्ना, बाक्टी या ठिकाणीसुद्धा वाघाची दशहत पसरली आहे.
बचाव दलाचे शर्तीचे प्रयत्न - नवेगावबांध येथील वन्यजीव जलद बचाव दलाचे सतीश शेन्द्रे, अमोल चौबे, मुकेश सोनवाने, प्रकाश पातोडे, राजू परसगाये, धनसकर, नखाते यांनी त्या घराचा व परिसराचा ताबा घेतला. घरात ठाण मांडून असलेल्या बिबट्याचा ठावठिकाणा शोधला. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन दरवाजासमोर पिंजरा मांडण्यात आला. समोरील व मागील दरवाजे कुलूपबंद करण्यात आले. मागील खिडकीतून त्या बिबट्याचा ठाव घेण्यात आला. जोखीम पत्करून अमोल चौबे, सतीश शेन्द्रे यांनी समोरून घरात प्रवेश केला. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर रात्री उशिरा बिबट पिंजऱ्यात कैद झाला.