गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून साडेतेरा हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन टँक गुरुवारी (दि.२२) रात्री मेडिकलमध्ये दाखल झाले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्यासंदर्भात अदानी वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर प्लांट उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक उभारण्यास सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेवरून तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतृून ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार होते. दरम्यान, हे काम संथगतीने सुरू होते, तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्वा वांरवार ही बाब खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, तसेच पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अदानी वीज प्रकल्पाने मेडिकलसाठी १३,५०० लिटर क्षमतेचे टँक गुरुवारी मेडिकलला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे पूर्ण लक्ष असून, माजी आ. राजेंद्र जैन हे सातत्याने जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
........
आयनाक्स कंपनीकडून होणार ऑक्सिजनपुरवठा
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी खा. पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणारी आयनाक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांत २० हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आता ऑक्सिजन टँक दाखल झाल्याने ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यास मदत होणार आहे. मेडिकलमध्ये ऑक्सिजन टँक दाखल झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलियार, नगरसेवक विनीत सहारे, सुनील पटले, रौनक ठाकूर यांनी टँक घेऊन येणाऱ्या चालकाचे स्वागत केले.