लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यात मिळून आलेल्या सात बाधितांनी डिस्चार्ज देण्यात आल्याने दिलासादायक स्थिती असताना, जिल्ह्यात बुधवारी (दि.८) एका बाधिताची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यात दोन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली असल्याने नागरिकांनी खबरदारीने वागणे गरजेचे झाले आहे. अवघ्या देशातच कोरोना नियंत्रणात आलेला असतानाच, जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मागील वर्षांपासून सुरू असलेला कहर यंद नियंत्रणात होता व जिल्हावासीयांनी कोरोनामुक्त दिवाळी साजरी केली. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली आहे. त्यातच तिरोडा तालुक्यात एकदम सात बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, आमगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला होता. मात्र, तिरोडा येथील सात बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे, तर बुधवारी (दि.८) अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला आहे. यामुळे आता जिल्ह्यात दोन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. आजपर्यंत ४१,२३५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे असून, ४०,५२५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या दोन आहे. क्रियाशील असलेल्या बाधित रुग्णांपैकी १ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण ९८.६ टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्युदर १.४ टक्के आहे, तर डब्लिंग रेट २९३४.६ दिवस आहे.
चाचण्या वाढविण्यात आल्या nजिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, आता ओमायक्रॉनचा प्रसार बघता, जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मंगळवारी ४६१ चाचण्या घेण्यात आल्या असून, यामध्ये आरटीपीसीआर ४०१ तर रॅपीड अँटिजन ६० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४,६७,३१७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. लसीकरणाशिवाय पर्याय नाही nकोरोनाची लस गंभीर संसर्गापासून वाचवित असल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळेच जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४,८२,१२२ डोसेस देण्यात आले आहेत. यामध्ये ९,२३,२९५ नागरिकांनी पहिला डोस तर ५,९९,७०७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र, आतापर्यंत ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे.