गोंदिया : रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनुक्यात (किसमिस) शुद्ध हरपण्याचे औषध घालून लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशा दोन घटना गोंदिया-बरोनी मुजफ्फरपूर एक्सप्रेसमध्ये गेल्या आठवडाभरात घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून त्या टोळीचे शोधकार्य सुरू आहे.गोंदिया-बरोनी एक्सप्रेस गोंदिया रेल्वे स्थानकातून रात्री ९ वाजता सुटते. या गाडीत इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासी संख्या कमी असते. याचाच लाभ गाडीत प्रवाशांप्रमाणे प्रवास करीत असलेली टोळी घेत आहे. ही टोळी प्रवाशांना आपल्या गोष्टीत फसवते, नंतर विश्वासात घेते व काजू-किसमिसमध्ये शुद्ध हरपण्याची औषध देवून सामान-साहित्य लुटते.बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथील रहिवासी सुमन सुलेमान बरूआ (६४) गोंदिया ते अनंतपूरपर्यंतचा प्रवास करीत होती. दरम्यान एका अनोळखी प्रवाशाने त्यांच्याशी ओळख वाढवून किसमिसमध्ये शुद्ध हरपण्याची औषध घालून चारली. सुमन बेशुद्ध होताच त्या प्रवाशाने त्यांचे तीन हजार रूपये, कपड्यांनी भरलेला बॅग, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना घेवून निघून गेला. त्यांना बेशुद्धावस्थेत अनूपपूर रेल्वे स्थानकावरून जीआरपीच्या पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले. याच गाडीमध्ये अनूपपूरसाठी प्रवास करणाऱ्या बालाघाट जिल्ह्याच्या बगदर्रा येथील रहिवासी भाऊलाल विक्रम नागपुरे यांना शुद्ध हरपण्याची औषध किसमिसमध्ये चारून रोख दोन हजार ५०० रूपये, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना घेूवन टोळी फरार झाली होती. या प्रकारामुळे प्रवाशांत दहशत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)किसमिसमध्ये शुद्ध हरपण्याचे औषध घालून प्रवाशांना चारले जात आहे. सध्या असे दोन गुन्हे दाखल आहेत. तपास कार्य सुरू आहे, पण अद्याप लुटारूंचा सुगावा लागलेला नाही. प्रवाशांनी सतर्क रहावे व संशयित प्रवाशांची तक्रार गोंदिया रेल्वे हेल्पलाईनवर करावी.’’एस.यू. सिंग,पोलीस निरीक्षक, गोंदिया रेल्वेस्थानक
रेल्वेतील प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय
By admin | Updated: February 13, 2015 01:10 IST