गोंदिया : रेल्वेची ई-तिकीट बनवून अवैध व्यापार करणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षादलाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई ११ जानेवारी रोजी करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारावर, सालेकसाच्या बाजार चौकातील अवैधरित्या रेल्वेची ई-तिकीट बनविणाऱ्या ग्लोब कम्प्युटर ई-सेवा केंद्रावर पथक गेले. दरम्यान, दुकान संचालक मधुकर मोहनलाल हरिणखेडे (वय ४१, रा. भाडीपार) याला रेल्वेच्या ई-तिकीट बाबत विचारले असता तो आयआरसीटीचा अधिकृत एजंट नाही, पण अधिक लाभ मिळविण्यासाठी दुकानात काम करीत असलेल्या राजेश पांडुरंग बागडे (वय ३२, रा. इसनाटोला) याच्यासह पर्सनल आयडीने रेल्वेची ई-तिकीट काढून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याच परवानगीने त्याच्या दुकानात ठेवलेले संगणक तपासण्यात आले. त्यात एस २ एलएम १२३ च्या नावे बनावटी पर्सनल आयडीने १ नग लाईव व ७ नग जुने रेल्वे ई-तिकीट असे एकूण ८ नग आणि ग्लोबमधू या नावे बनावटी पर्सनल आयडीने एकूण ४ नग रेल्वेच्या जुन्या ई-तिकीट आढळल्या. याबाबत अधिक चौकशी केल्यावर त्यांनी ऑनलाईन आधार कार्ड बनविण्याचे काम आहे. त्या कामासाठी ग्राहक त्याच्याकडे येतात. काही ग्राहक रेल्वे ई-तिकिटाची मागणी करतात. त्याचा सोबती ते बनवून देतो. त्याचा मोबदला म्हणून तिकीट भाड्याशिवाय अतिरिक्त ५० ते १०० रुपये ग्राहकांकडून घेत असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३ चे उल्लंघन झाले आहे. त्या दोन्ही आरोपींकडून एकूण ६५ हजार ८६ रुपयांचा माल जप्त करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुग, सहायक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी नंदबहादूर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मयंक मिश्रा, आरक्षक नासीर खान, आरक्षक बी. कोरचाम, आरक्षक एल. एस. बघेल, आरक्षक आर. जी. बंधाटे यांनी केली.