गोंदिया : दुकानातील सामान रस्त्यावर ठेऊन अतिक्रमण करणाऱ्या १३ दुकानदारांवर येथील वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली. १२ डिसेंबर रोजी दुपारी येथील इंदिरा गांधी स्टेडियमसमोर असलेल्या फुटपाथवर करण्यात आलेल्या या कारवाईत दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले. शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असल्याने वाहतुकीची समस्या नेहमीची झाली आहे. त्यातही बाजार भागात दुकानदार आपल्या दुकानांतले सामान रस्त्यावर ठेऊन अतिक्रमण करीत असल्याने नागरिकांना आवागमनासाठी रस्ता अरूंद पडतो. यातूनच बाजारभागात दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. शिवाय ट्राफीक जाममुळे नागरिकांची डोकेदुखी वाढते. यामुळे नागरिकांत य दुकानदार व वाहतूक विभागाप्रती रोष व्याप्त आहे. ही बाब हेरून वाहतूक नियंत्रण विभागाने १२ डिसेंबर रोजी दुपारी इंदिरा गांधी स्टेडियम समोरील फुटपाथवर अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. या मोहमेदरम्यान विभागाने येथील १३ दुकानदारांवर कलम १०२ अंतर्गत कारवाई करून रस्त्यावर असलेले त्यांचे सामान जप्त केले. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण विभागाकडून बाजार भागात आता सतत अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे कळले. या कारवाईत वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सतबीर, केशव वाभळे, पोलीस हवालदार मुन्ना चंदेल, विरेंद्र गोसावी, राजेश नेताम, चांगेश्वर उईके, जितेंद्र गिरी, नायक पोलीस शिपाई प्रदीप डहारे, सविता बिसेन, शारद मौर्या, देवचंद नेवारे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अतिक्रमण करणाऱ्या १३ दुकानदारांवर कारवाई
By admin | Updated: December 13, 2014 01:38 IST