गोंदिया : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची शनिवारी (दि.१) सांगता करण्यात आली. २७ आॅक्टोबर रोजी सदर सप्ताहाची सुरुवात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात भ्रष्ट्राचार निर्मूलनाबाबत घेण्यात आलेल्या शपथविधीने करण्यात आली. याअंतर्गत कार्यालयाच्यावतीने जनसामान्यात भ्रष्टाचाराबाबत जागृती करण्याकरिता कार्यालय व कार्यपद्धतीविषयी माहिती देणारे फलक जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात आल होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकरिता नव्याने सुरुवात करण्यात आलेला टोल फ्री क्रमांक २०१४ हा सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याकरिता याबाबतची पत्रके जिल्ह्यातील तसेच सर्व तालुक्यातील बसेस, खासगी वाहने व गावागावांत लावण्यात आली. ग्रामीण भागात टोल फ्री क्रमांक २०६४ च्या प्रचार व प्रसारासाठी आठवडी बाजाराचे दिवशी पत्रके वाटण्यात आली. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना विभाग व त्याची कार्यपद्धतीबाबत समजावून सांगण्यात आले.भ्रष्टाचारबाबत जनजागृतीकरिता ग्रामपंचायत पातळीवरही कार्यक्रम घेण्यात आले. ग्रामपंचायत कामठा येथे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सामाजिक संघटना व प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्यामार्फत आजूबाजूच्या परिसरातील अधिकाधिक लोकापर्यंत भ्रष्टाचार निर्मूलनात लोकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.तर शनिवारी (दि.१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात यशस्वी सापळा कारवाईकरिता तक्रार देणाऱ्या तक्रारदारांचा स्वातंत्र संग्राम सेनानी महादेवराव बिडवाईकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या तक्रारदारांप्रमाणेच ईतरही नागरिक अधिकाधिक संख्येने भ्रष्टाचार विरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा यावेळी बिडवाईकर यांनी व्यक्त केली. विभागाने २०१४ मध्ये आतापर्यंत एकूण १९ यशस्वी कारवाया केल्या आहेत हे विशेष. याप्रसंगी विभागाचे उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांनी, भ्रष्टाचारविरोधात तक्रार देण्यासाठी अधिकाधिक संख्येने नागरिकांनी पुढे यावे. त्यांना याबाबत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांक २०६४ वर संपर्क साधावा. लाचेच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर तक्रारदारांचे संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेले काम विभाग पूर्ण करुन देण्यास सहकार्य करेल असे आवाहन आवाहन केले. (शहर प्रतिनिधी)
एसीबीच्या दक्षता जागृती सप्ताहाची सांगता
By admin | Updated: November 1, 2014 23:10 IST