नरेश रहिले/यशवंत मानकर - आमगावआमगावात सुशिक्षित तरूणांमध्ये बेरोजगारी वाढल्याने तरूणांनी रोजगार नसल्याचे पाहून चक्क ‘सुपारी’ घेण्याचा धंदा सुरू केला आहे. या प्रकारामुळे आमगावात दहशत पसरली आहे. एका व्यक्तीची सुपारी घेऊन ते काम मोठ्या शिताफिने केल्यामुळे ते यशस्वी राहिले. त्यानंतर या तरूणांनी सुपारी घेण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. त्यामुळे आमगावातील दरोडाच्या प्रकरणात अडकलेल्या एका तरूणाने एक खून केल्याची कबूली दिल्यानंतर दिवाळी नंतर ते दोन खून करणार होते अशीही माहिती दिली आहे.आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील फर्निचर दुकानदार धनराज रूपचंद तिरेले (३६) याचा २८ सप्टेंबर २०१३ रोजी खून करण्यात आला होता. धनराजचा गोंदियातील साळा व त्याच्या मुलाने एक लाख रूपयात त्याचा खून करण्याची सुपारी दिली होती. धनराजच्या साळ्याने आपल्या बहिणीला जमिनीचा हिस्सा न देताच तिला जमीन विक्री करण्याची परवानगी मागत होता. त्यामुळे तिने नकार दिला. यामुळे बहिण-भावात खटकले. बहिणीच्या पतीला संपविण्याचा चंग धनराजचा साळा दौलत रामा शेंडे व त्याचा मुलगा मनोज दौलत शेंडे दोन्ही (रा. सरदार भगतसिंग वॉर्ड, गोंदिया) यांनी बांधला. दौलत शेंडे यांची २ख आर जमीन आहे. ती त्याने विकायला काढली होती. त्या जमीनीचा बयाणाही घेतला होता. परंतु बहीण हक्क मागत होती. त्यामुळे यातून या वादाला सुरूवात झाली. अन् दौलतने धनराजची सुपारी देण्याचे ठरविले. दौलतचा मुलगा त्याच्या घराजवळील गोंदियातील एका कुख्यात आरोपीकडे खेळायला जायचा. यामुळे दौलतची त्याच्याशी ओळख झाली. त्याला दौलतने धनराजचा काटा काढायचा आहे. त्यासाठी माणसे शोध असे सांगितले. त्यावर दौलतच्या घराजवळील आरोपीने आमगाव तालुक्याच्या श्रावणटोली माल्ही येथील एकाला सुपारी घेणारे व्यक्ती शोधायला सांगितले. त्याने रिसामा येथील २६ वर्षाच्या तरूणाला शोधले. श्रावणटोली येथील आरोपी व रिसामा येथील आरोपीच्या वडीलासोबत जनावरे विक्रीचा व्यवसाय करायचा. तसेच फर्निचरचे काम करायचा. मृतक धनराजही फर्निचरचा काम करायचा. परंतु या दोघांत ओळख नव्हती. श्रावणटोली येथील आरोपी सोबत त्याच्याच गावातील एक इसम फर्निचरचा काम करायचा. त्याची ओळख धनराज सोबत होती. तर रिसामा येथील आरोपी व त्याचा कुंभारटोली येथील मित्र यांनी ही घटना घडवून आणली. श्रावणटोली येथील दोन्ही आरोपी धनराजला घेण्यासाठी गोरठा येथे गेले. नवीन घराच्या फर्निचरचे दार बनवायचे आहेत, असे सांगून त्याला आमगावच्या कामठा रस्त्यावरील बलीराम चुटे यांच्या नवीन घरात आणले. या घरात रिसामा येथील व कुंभारटोली येथील आरोपी धनराजचा खून करण्यासाठी लपून बसले होते. धनराज तिथे आल्यावर त्याने पहिल्या, दुसऱ्या दाराचा मोजमाप केला. तिसऱ्या दाराचा मोजमाप करीत असताना लपून बसलेल्या दोघांनी त्याच्यावर राप्टरने वार केला. नंतर चाकूने अंगावर २५ घाव घातले. यात धनराज जागीच ठार झाला. ही घटना दुपारी १ वाजताची आहे. त्यांनतर या घटनेत आमगाव पोलिसांकडून एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ओळख परेडनंतर नावे जाहीर होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
आमगावात वाढलाय ‘सुपारी’चा धंदा
By admin | Updated: November 2, 2014 22:36 IST