चार हजार ४८० प्रकरणे : विशेष तिकीट तपासणी अभियान गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे नागपूर-गोंदिया-राजनांदगाव या लोहमार्गावर धावणाऱ्या प्रवाशी गाड्यांमध्ये १ ते १५ एप्रिलपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात तब्बल चार हजार ४८० प्रकरणे विनातिकीट तथा अनियमित प्रवासाचे नोंदवून त्यांच्याकडून दंड स्वरूपात ९.८६ लाख रूपये वसूल करण्यात आले. मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विशेष तिकीट तपसणी अभियान राबविण्यात आले. मंडळातील नागपूर-गोंदिया-राजनांदगाव मार्गावरून ये-जा करणाऱ्या एकूण १६६ प्रवासी गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकात १ ते १५ एप्रिल २०१७ पर्यंत सदर अभियान राबविण्यात आले. यात विविध विशेष तिकीट तपासणी अभियानांतर्गत विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच विना माल बुक केलेले लगेचचे चार हजार ४८० प्रकरणे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात नऊ लाख ८६ हजार १६० रूपये वसूल करण्यात आले आहे. गोंदिया स्थानकासह जिल्ह्यातील अनेक स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा पसरविला जातो. रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबवून त्याबाबत जनजागृतीसुद्धा केली जाते. तरी प्रवाशांमध्ये जाणीवजागृती न झाल्याचे अनेक प्रकरणांतून दिसून येते. केरकचरा पसरविणाऱ्यांचे तब्बल १४५ प्रकरणे या १५ दिवसांत पकडण्यात आले. तसेच त्यांच्याकडून दंडस्वरूपात २२ हजार ९५० रूपये वसूल करण्यात आले आहे. सदर विशेष तिकीट तपासणी अंतर्गत तुमसररोड येथे किलेबंदी चेकिंग करण्यात आली. दरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांच्या नेतृत्वात १० एप्रिल रोजी ६४३ विनातिकीट/अनियमित प्रवास तथा विना माल बुक केलेले लगेजची प्रकरणे नोंदविण्यात आले. या प्रकरणांतून केवळ एका दिवसात एक लाख १५ हजार २२५ रूपये वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी) युनिक कार्डसाठी १ व २ मे रोजी शिबिर रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाद्वारे दिव्यांगांना रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे सुट देण्यासाठी युनिक कार्ड जारी केले जाते. युनिक कार्ड जारी करण्याबाबत संबंधित शासकीय चिकित्सकाद्वारे व्यक्तीच्या नि:शक्ततेचे प्रमाणपत्र व मूळ रेल्वे कंसेशन प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या प्रमाणपत्राच्या सत्यापनात विलंब होत असल्यामुळे रेल्वेद्वारे युनिक ओळखपत्र जारी करण्यात विलंब होत आहे. त्यामुळे दिव्यांगांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिव्यांगांना रेल्वे सवलत मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरद्वारे १ व २ मे २०१७ रोजी गोंदिया स्थानकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित राहतील. या शिबिरात वाणिज्य विभागाचे अधिकारी तथा गोंदियाचे स्थानिक शासकीय चिकित्सक उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तिंना नि:शक्तता प्रमाणपत्र व रेल्वे कंसेशन प्रमाणपत्रांचा सत्यापन करतील. त्यामुळे वाणिज्य विभागाद्वारे युनिक कार्ड त्वरित जारी केले जावू शकतील. दिव्यांगांनी आपल्यासह फोटो, ओळखपत्र, एड्रेस प्रूफ, जन्म प्रमाणपत्र, चिकिस्येसंबंधी दस्तावेज सोबत आणावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.
१५ दिवसांत ९.८६ लाख वसूल
By admin | Updated: April 20, 2017 01:12 IST